*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुझ्यासम तू.. अद्वितीय..*
तू जगतोस
निस्वार्थपणे जिणे
तू नेहमीच खरा असतोस
तरीही समोरच्याला
कधीतरी खटकतोस..
तू घर करतोस
कुणाच्या हृदयात, हळव्या मनात..
आठवण बनून तरळतोस..
कधी कधी भरल्या डोळ्यात..
निर्झरासम वाहतोस
गालांवरून अश्रुंच्या धारात..
तू रिती करतोस ओंजळ
चिमुकल्या सुखांनी भरलेली
कुणाच्या पदरात, कुणाच्या नशिबात..
अपेक्षा तरी कुठे असते तुला..
जपावं कुणीतरी आपलं समजून
तुला त्यांच्या आयुष्यात..?
तू हास्य खुलवतोस
कितिक मलुल पडल्या चेहऱ्यांवर..
अन् उधार घेतोस..
दुःख त्यांची जपण्या उरात..
तू बनतोस कुणाचा आधार
वाहतोस कुणाच्या स्वप्नांचा भार..
पण, बनते का कुणी काठी तुझ्यासाठी..
फुलल्यावर घर संसार..?
तुला छळतच नसतील ना हे प्रश्न…!
अन् तू पाहतही नसशील मागे वळून
कुणी पाहतंय का तुला..
सर्वस्व त्यागून जाताना..!
खरंच..
नसशील रे तू असामान्य..
पण.., मी पाहिलाय..
तुझ्यासम एकमेव तूच..!
अद्वितीय..!
© दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६