कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता दिवसरात्र पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जनतेच्या कल्याणार्थ सावंतवाडी शहर परिसरात केलेल्या अमूल्य कार्याबद्दल सावंतवाडीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांचा कोरोना देवदूत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. श्री देव विठ्ठल- रखुमाई शेतकरी संघटना सिंधुदुर्गच्यावतीनं हा सन्मान करण्यात आला. ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच औचित्य साधून संघटनेचे सल्लागार फ्रान्सिस रॉड्रिक्स यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वाती यादव यांना प्रदान करण्यात आला.
स.पो.नि. स्वाती यादव या लॉकडाऊन च्या कालावधीत लोकांना शिस्त लागावी, नियमांचे काटेकोर पालन व्हावे, आणि कोरोनाचे संकट शहरवासीयांवर येऊ नये यासाठी कठोर परिश्रम घेत होत्या. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता उन्हातान्हात नाक्यांनाक्यांवरील बंदोबस्ताची तपासणी करत, बेशिस्त नागरिकांना शिस्त लावत, काहीवेळा कठोर कारवाई करून पुन्हा चूक होणार नाही याची जाणीव करून देत आपली ड्युटी अत्यंत प्रामाणिकपणे बजावत होत्या. त्यामुळे सावंतवाडी शहरात दबंग पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
स.पो.नि. स्वाती यादव यांच्या लॉकडाऊन मधील जनहितार्थ केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे श्री देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना कोरोना देवदूत हा सन्मान दिला. यावेळी जनतेच प्रेम आपल्याला काम करण्याची अधिक ऊर्जा, ताकद देत असतं असं मत स.पोलिस नि. स्वाती यादव यांनी व्यक्त केले. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनांनी अशाप्रकारे दखल घेतली की अधिकाऱ्यांनाही काम करण्यास प्रेरणा मिळते. स्वाती यादव या देखील अत्यंत शिस्तीच्या आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत त्यामुळे त्यांचा गौरव नक्कीच पोलीस दलाला उत्तमोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा देईल यात तिळमात्र शंका नाही.
या सत्काराच्यावेळी श्री देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, फ्रान्सिस रॉड्रिक्स,भाई देऊलकर, सुरेश सावंत, उदय पारिपत्ये, बबलू राऊळ, अर्जून ठाकूर, दत्तप्रसाद माणगावकर, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, साईश निर्गुण, अक्षय मयेकर, सुधा कवठणकर आदी उपस्थित होते.