*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि ग सातपुते लिखित कवितेचे कवयित्री सौ.ऐश्वर्या डगांवकर यांनी केलेलं रसग्रहण*
*ब्रह्ममुहूर्त*
🎍🎍🎍🎍
न कळले मी भावशब्दात कां गुंतलो
शब्दा शब्दातूनी व्यक्तच होत राहिलो….
मनभावनांचे आभाळ मोकळे मोकळे
मी एकांतात अलवार पांघरीत राहिलो….
संवेदनांचा माहोल साराच मन:स्पर्शी
त्याला मिठीत घेता घेता तृप्त जाहलो….
काळजातील अव्यक्ताचे गूढ मनस्वी
हृदयांतरात फक्त कवटाळीत राहीलो…
नि:शब्दांचे , परमपावित्र्य अलौकीक
आत्ममुख होता होता , उमजू लागलो…
तिरावरती गंगौघाची झुळझुळ मनोहर
ब्रह्ममुहूर्तावर निरवतेत मी ऐकू लागलो….
🎍🎍🎍🎍🎍🎍🎍🎍🎍🎍
*30 एप्रिल 2025 ( 40 )*
*©️वि.ग.सातपुते. ( भावकवी )*
*📞 ( 9766544908 )*
*कवितेविषयी थोडं– भावकवी वि.ग.सा.चे मंतव्य*
——————————————–
‘ *तेणेंचि कळे मनासी मंतव्य*
*बुद्धीसि बोधव्य ‘या उक्तीप्रमाणे या रचनेत दिसून येतात.*…..
आत्मबोध झाल्यावर किंवा साक्षात्कार झाल्यानंतरची अवस्था छान वर्णिली आहे.
आतापर्यंत उगाच शब्दांशी मी खेळत राहिलो,त्यांच्या मोहात गुंतलो आणि मग ते शब्दांतून व्यक्त करत राहिलो…
परंतु मनातील भावनांचे मुक्त आभाळ
… खरंतर आकाश म्हणायला हवे पण आकाश हे तर निरभ्र असते आणि आभाळ मात्र भरलेले असते म्हणून विविध भावनांनी भरलेलं आभाळ एकांतात मी पांघरलं,कारण मला सर्वच भावना जगास दाखवायच्या नव्हत्या म्हणून मनातल्या मनात मी त्यांचं मंथन करत राहिलो.
अशा त्या संवेदना , भावनांना अनुभवताना मी तृप्त झालो
माझ्या मनातच त्यांना आलिंगन दिलं
*त्या अव्यक्त भावनांतून जे गुढ मला जाणवलं ते मी व्यक्त न करता फक्त हृदयासी कवटाळत राहिलो.*
*नि:शब्द रहाण्यात देखील किती सुख आहे ते मी अनुभवलं.त्याचं पावित्र्य जपलं.!*
कारण ते खरं आत्मसुख होतं ते मला आत्मचिंतनातूनच उमगलं होतं.
त्यामध्ये लीन होताना मन गंगेच्या तीरावरील गंगौघाची संथ झुळझुळ
म्हणजेच ईश्वराची अगम्य चाहूल त्या परमपित्याची चाहूल मला लागली होती.पहाटेच्या निवांत समयी नीरव शांततेत मी ‘ त्या ‘
चे अस्तित्व अनुभवू लागलो.
*अतिशय सुंदर शब्द संपदा हे वि.ग.सां.चे वैशिष्ट्य आहे.जीवन परिपूर्ण झाल्यानंतरची ही तृप्ती आहे .असंही म्हणायला हरकत नाही.आत्मचिंतन करायला लावणारी आणि सर्वांनाच अध्यात्मिक बोध देणारी ही कविता आहे असं मला वाटतं.*
*©️ सौ ऐश्वर्या डगांवकर. रावेत पुणे.*

