*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य गोव्यातील कवी-लेखक श्री प्रकाश रामचंद्र क्षीरसागर लिखित पुस्तक परीक्षण*
ते देखे कवी – मला कवीचा चष्मा लागला
✒️कवी-अरुण वि.देशपांडे
——————————–
गावाकडून शहरात आलेल्या प्रत्येक कवीची व्यथा मांडणारी ही कविता गावाकडे मन धाव घेते बालपणीच्या आठवणी त्यातून व्यक्त झाल्या आहेत गावाकडे आई, आजी- आजोबांच्या संगे घालवलेले सुखद दिवस कवी आठवतो. गोठ्यातली गाय, आजीने दिलेली दाट साय. पण हे सारे त्याला स्वप्नात दिसते. गुरुजी आणि सवंगडीही आठवतात.
लहानपणी त्याला सर्वत्र घनदाट झाडी, सर्वत्र शांत वातावरण आणि ती समृध्दी त्याला भुरळ घालते. डागडुजी इमारतीची ही कविता माणसाची सद्यस्थितीचे वर्णन करणारी आहे. मंडईत भेटणारे लोक स्वतःवरच वैतागलेले आहेत. त्यांचं मन विकारी आणि जर्जर झालेले आहे. डोक्यापासून पायापर्यंत डागडुजीची गरज आहे, असं त्याला वाटतं.
कविवर्य अरुण देशपांडे यांची कविता ही अस्वस्थ मनाचे प्रतीक आहे. त्याला ती साथसंगत करते. कविता म्हणजे भावनांचे प्रतिबिंब असे कवी म्हणतो. मनाची घालमेल झाल्यावर ती त्याचे सांत्वन करते.
कवी निकराने लढाईवर निघालाय त्यावेळी तू पाठीवर हात ठेवं असं तो म्हणतो. कठीण वाटचालीत सोबतीला ये. दुष्ट आणि कठोर जगाला क्षणभर विसरू त्या क्षणी तू पाठीवर हात ठेव, असे तो कवितेला सांगतो.
स्त्रीची दोन रूपं आई आणि बाई एकच स्त्री दोन्ही भूमिका निभावते. लहानगी ताई मोठी झाली की बाई होते नंतर आई.घराची अब्रू बाई असते. घराचे घरपण आईच असते. आईवर त्यांचं खूप प्रेम. ही वात्सल्यमूर्ती आई. किती सोशिक, सहनशील. बाळाला चालायला शिकवते. ती सर्वांचे दैवत असते. लेकरं कितीही मोठी झाली तरी आईला ती लहानच असतात. आईची कविताही अशीच मातृप्रेमाने भरलेली आहे. माता या कवितेत देखील माता हीच ईश्वर असते. बाळाचे मन ओळखते. सर्वांना अशी माय मिळू दे असे मागणे ते देवाकडे मागतात. माणसाने उंच भरारी जरूर घ्यावी पण पाय मात्र जमिनीवर ठेवावेत. जिद्दी माणसाच्या पायात खोडा घालणारे जगात भरपूर आहेत त्या साऱ्यांना पुरून उर, असा सल्ला कवी देतो.
एकंदर या संग्रहातील कविता मनातील भावना कागदावर उतरविणाऱ्या आहेत. मला कवीचा चष्मा लागला या कवितेत आपला दृष्टीदोष सुधारला असं सांगून माणूस नीट समजू घेणे आपल्याला कळू लागले. आत्मपरीक्षण करायला या चष्म्याने लावले. या संग्रहातील कविता आत्मचिंतन करायला लावणाऱ्या आहेत. ८० कवितांतून कवी व्यक्त झाला आहे. मराठी भाषेचा त्यांना अभिमान आहे. घरात मराठीच बोला असा आग्रह ते धरतात. माय लेकरांनी मराठीतून संभाषण करावे, मराठी माणसाने एवढे ऐकावे, असे ते सांगतात. संग्रहातील कविता मनावर आणि तनावरही आहेत. त्यांची मातृभक्ती ते कवितेतून प्रकट करतात. आपलं मन अस्थिर आणि अशांत असताना व ताळ्यावर नसताना त्याला कुणी समजावायचं असा प्रश्न कवीला पडतो. कवी दुःखाच्या मनस्थितीचाही विचार करतो.असतील शिते तर जमतील भुते या म्हणीचा प्रत्यय कोण जाणेल कितपत या कवितेत येतो. मनावरदेखील अनेक कविता या संग्रहात आहेत.
‘स’ची कवितामध्ये जीवनात स किती महत्त्वाचा आहे, ते सांगितले आहे. संसार आनंददायी करणारा स असो की सीमा रक्षण करणारासैनिक. सहज काही मिळत नसते. सायासावीण काही मिळत नसते, असा उपदेश ते करतात. माणसाचे स्वभाववर्णन करणारी कविता माणसांची आहे. आपल्या अवतीभवती किती प्रकारची माणसे आहेत. कविता कशी जन्मते हे देखील ते सहज सांगून जातात. वेदनेशिवाय कवितानिर्मितीला पर्याय नाही. मन अशांत अस्वस्थ असेल तरच कविता होते, असं ते सांगतात.
बाई आणि माहेराचे नाते सनातन आहे. बाईला माहेर काय वाटते हे माहेर कवितेत पाहायला मिळते.
या संग्रहात आईवर अनेक कविता आहेत. त्यातून त्याची मातृभक्ती दिसून येते. अरुण देशपांडे हे परभणी येथील रहिवासी. बँकेतील नोकरी सांभाळून साहित्य निर्मिती त्यांनी केली. पण कवितेत कधी आकडेवारी आणली नाही. संवेदनशील मनाची कविता ते जपत राहिले. कवीच्या चष्म्यातून ते जग पाहतात. आणि कवितेलाही पाहतात.
**********
परिचय लेखक
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर -गोवा
९०११०८२२९९
*********
मला कवीचा चष्मा लागला
अरुण वि. देशपांडे
पृष्ठे ९६, मूल्य १५० रुपये.
प्रकाशक संवेदना प्रकाशन,
चिंचवड गाव पुणे
————————-

