अजय कांडर लिखित ‘युगानुयुगे तूच’ नाटक 4 रोजी देवगडला
रघुनाथ कदम यांचे दिग्दर्शन – अभिनेते सचिन वळंजु यांचा अभिनय
दूरदर्शनच्या निर्मितीनंतर ‘युगानुयुगे तूच’ पुन्हा रंगमंचावर
कणकवली
मुंबई दूरदर्शनने निर्मिती करून प्रसारित केलेले कवी अजय कांडर लिखित ‘युगानुयुगे तूच’ हे नाटक मुंबई कांचन आर्टतर्फे पुन्हा रंगमंचावर येत आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे ‘ या विषयाच्या केंद्रस्थानी असलेल्या अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच’ या दीर्घ कवितेचे हे एकपात्री नाट्यरूपांतर आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक मराठी रंगभूमीवरील तरुण अभिनेते सचिन वळंजू ते सादर करत आहेत.रविवार ४ मे रोजी सायं. ७ वा.देवगड – जामसंडे येथील श्री स्वामी समर्थ सभागृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आयोजित करण्यात आला असल्याची माहिती दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी दिली.
कवी अजय कांडर यांची मुंबई लोकवाड:मय गृहतर्फे युगानुयुगे तूच ही दीर्घ कविता प्रसिद्ध झाल्यानंतर तिच्या एक वर्षभरात तीन आवृत्ती प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर या संग्रहावर स्वतंत्र मान्यवरांनी समीक्षा लेखन केलेला समीक्षा ग्रंथही प्रसिद्ध झाला. प्रसिद्ध भाषांतरकार डॉ. सुधाकर शेंडगे यांनी अनुवाद केलेला युगानुयुगे तूचचा हिंदी अनुवाद दिल्ली वाणी प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला. सदर हिंदी अनुवाद छ. संभाजीनगर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम ए च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. अशा या बहुचर्चित काव्यसंग्रहाचे अजय कांडर यांनीच नाट्यरूपांतर केले असून मुंबई दूरदर्शनने या नाट्यरूपांतरचा प्रयोग सादर केला होता. त्यानंतर आता हे नाटक मुंबई कांचन आर्टतर्फे पुन्हा रंगमंचावर सादर होत आहे.
सचिन वळंजू हा तरुण गुणी अभिनेता मराठी नाटक आणि दूरदर्शन मालिका यामध्ये कलाकार म्हणून कार्यरत असून त्यांनीच युगानुयुगे तूच नाटकाची निर्मिती केली आहे आणि तेच रंगमंचावर हे नाटक सादर करत आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी केले असून यापूर्वीच्या या नाटकाचेही दिग्दर्शने त्यांनीच केले होते. रघुनाथ कदम हे ज्येष्ठ दिग्दर्शक असून कवी अजय कांडर लिखित ‘कळत्या न कळत्या वयात’ हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर सादर होत असून त्याचे दिग्दर्शनही रघुनाथ कदम यांनीच केले आहे. युगानुयुगे तूच या नाटकाच्या निर्मितीबद्दल सचिन वळंजू म्हणतात की, कवी अजय कांडर यांची युगानुयुगे तूच ही दीर्घ कविता लोकप्रिय आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समग्र मानवाच्या कल्याणासाठी कसे कार्यरत होते याचे महत्त्व ही कविता अधोरेखित करते. जात धर्म पंथ या सगळ्या पलीकडे बाबासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारातून सगळा समाज एकत्र राहू शकतो. याची मांडणी या कवितेत करण्यात आल्यामुळे या कवितेचा रंगमंचीय अविष्कार करणे ही आनंददायी घटना असल्यामुळेच मी या नाटकाची निर्मिती केली आहे. तरी या नाट्यप्रयोगाला नाट्य रसिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन श्री वळंजू यांनी केले आहे.