You are currently viewing काकल्याचे तर्कट-११

काकल्याचे तर्कट-११

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार साहित्यिक विनय सौदागर लिखित अप्रतिम लेख*

 

*काकल्याचे तर्कट-११*

 

*फोनार काम*

 

काकल्या कधीचा येऊन बसला होता. चहा झाल्यावर तो मला म्हणाला, “मागे तुका जा मी सांगललय, त्येचो इचार केल्लय काय?”

“कसला?”

“अरे धंद्याचो. जम्नी इकूचो धंदो. त्येचा काय केलंय?” मी हसलो. तर म्हणाला, “ह्या नाय जमणा तर दुसरो धंदो सांगतय.” मी काहीच बोललो नाही, तर तो म्हणाला, “एक धंदो कम समाजकार्य आसा. बिनपैशाचा. आपल्याकडे फक्त येक फोन होयो आणि सगळ्यांचे फोन नंबर लागी करूक होये.”

“त्याने काय होईल?” मी विचारलं. काकल्या म्हणाला, “कोणाचा काम असला, काय आपण फक्त फोन लावायचो. म्हणजे असा, कोणीतरी तुका ‘चिरे खय मेळतीत’ असा इचारला काय, आपण त्येका काय सांगायचा नाय. डायरेक्ट चिरेवाल्याक फोन लावायचो आणि माणूस पाठयतय हून सांगायचा. हेका तडे पाटवन् द्यायचो. कोंड दाखवायची नाय, फकस्त गाथन जोडून दिवची. जमीन इचारू दे, पत्रे इचारू दे, लाकूड तोडणारो इचारू दे नायतर पुस्तक छापणारो इचारू दे; फक्त जोडणी करत बसायचा.”

“त्याच्यामुळे काय होईल?”

“अरे आपला क्रेडिट वाढत जातला. आपणाक काय्येक करूक नको आणि जे येळाक आपला काम आसता ते येळाक त्याच दुकानदाराकडून किंवा कामगाराकडसून आपण कमिशन वसूल करायचा. सध्याचा ह्या येक नंबरचा समाजकार्य आसा. बरा हेच्यात लुकसानी कायच् नाय. अरे फेसबुक, इन्श्टा, व्हाॅटसप वरती पडीक असणाऱ्या माणसापेक्षा ही माणसा फोनचो खरो उपेग करतत. हुशार, कष्टाळू लोका वडोपाव चावत काम करून जो पैसो साठयतत्, तोच पैसो हे समाजसेवक तीन टाईम जेवन् हडे मेळयतत. हेंचो फोन ह्यो पेटीएम् नसान एटीएम् आसा.”

खरंच, मी जेव्हा आसपास पाहतो, तेव्हा जोडणी करणारेच खूप आहेत असे दिसतय. काम करणारी माणसं मात्र मिळत नाहीयेत.

“तुझ्या तोंडावरसून तुका ह्या पटलला दिसता. अरे पटतलाच, कलियुग हा ह्या. खोट्याचीच चल्ती आसतली. बरा, पटला तर झिलाक लायतय काय ह्या समाजसेवेक.” काकल्या आमच्या कुलदीपकावर घसरला होता, म्हणजेच त्याची निघण्याची वेळ झाली होती, हे माझ्या लक्षात आलं आणि खरच डोक्यात दुसरं तर्कट घोळवत् काकल्या चालू पडला.

 

*विनय सौदागर*

आजगाव, सावंतवाडी

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा