दोडामार्ग :
छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेले बलिदान या प्रेरणेतून धर्माभिमान जागृत ठेवण्यासाठी शिव पाईकांनी बलिदान मासात झरेबांबर तिठा येथे एका रात्रीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती संभाजी महाराजांचे पहिले भव्यदिव्य स्मारक आहे. याच महाराजांच्या स्मारकाचे रविवारी दिनांक २७ एप्रिल रोजी संध्या ५ वाजता लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दोडामार्ग व शिवप्रेमींकडून करण्यात आले आहे.
देव देश आणि धर्मासाठी स्वतःचे बलिदान दिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक प्रत्येक ठिकाणी व्हावे. यातूनच हिंदू धर्म जागृत ठेवण्याची भावना प्रत्येक हिंदुंच्या मनात रुजली पाहिजे. या हेतूने तमाम शिवपाईक व शिवप्रेमी, धारकरी काम करीत आहेत. तालुक्यातील काही धारकऱ्यांकडून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक दोडामार्ग तालुक्यात उभारले जाणार अशी गुप्त चर्चा सुरू होती. त्या पद्धतीने युद्ध पातळीवर नियोजन सुरू होते. मात्र, हे स्मारक कोणत्या ठिकाणी उभारले जाणार कोणालाच माहीत नव्हते. धर्माभिमानी शिवपाईक या मोहिमेसाठी तन, मन, धन अर्पण करून या कामात झोकून दिले होते. राष्ट्र पुरुषांचे स्मारक उभारण्यास प्रशासकीय मान्यतेस क्लिष्टता असून अनेक अडचणी समोर ठाकतात. त्यांच्याच गनिमी काव्याने छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारून शिवपायिकांनी आपल्या स्वप्नातील संकल्पना सत्यात उतरवली. या कार्यात काहींनी अंगमेहनतीने, काहींनी वस्तू स्वरूपात तर काहींनी आर्थिक स्वरूपात हातभार लावला आहे. “धर्मरक्षक, धर्माभीमानी छत्रपती संभाजी महाराज”यांचं भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.
उद्या रविवारी संध्याकाळी ५ वाजता सिंधुरत्न ढोलताशा पथक वेतोर यांच्यामार्फत ढोल ताशांचा गजर होणारा आहे. तर ब्राह्मणाच्या विधिवत मंत्रोपचारात छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा, अभिषेक होणार आहे. तसेच संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानावर आधारित व्याख्यान होणार आहे. तरी या सोहळ्यास धारकरी, शिवपायिक, व शिवप्रेमींनी या खास सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दोडामार्ग यांनी केले आहे.

