*लालीत्य नक्षत्रवेल तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री सौ. स्नेहा धोंडी नारिंगणेकर लिखित अप्रतिम लेख*
*पुस्तकांवर बोलू काही*
*चक्र*
✒️लेखक -जयवंत दळवी
🖊️रसग्रहण:- सौ स्नेहा नारिंगणेकर
कसं असतं ना ..आपण रोजचं जीवन जगत असताना, आपण आपल्याच अवतीभोवती घडत असणाऱ्या घडामोडी मध्ये, आपल्याशीच संबंधित असलेल्या गोष्टींमध्ये ,इतके गुरफटून गेलेलो असतो की, त्याही पलीकडे एक जग असतं हे आपण विसरूनच गेलेलो असतो.
पण काही पुस्तके अशी असतात की ती आपल्याला आपल्या नेहमीच्या वर्तुळा बाहेरच्या जगाची ओळख करून देतात. अशाच एका आपल्या डोळ्यासमोर असून आपल्या नेणीवेेत असलेल्या, जगाची ओळख करून देणाऱ्या पुस्तकाविषयी बोलणार आहोत.
हे पुस्तक आहे जयवंत दळवी लिखित चक्र ही त्यांची पहिलीच कादंबरी.
दळवी नी एकूण 15 कथासंग्रह, 21 कादंबऱ्या ,19 नाटक, प्रवास वर्णन, व्यक्ती चित्रे ,लिहिली. त्यांची अनेक पुस्तके गाजली, त्यांच्या अनेक पुस्तकांवर चित्रपट निघाले.
त्यांचा जन्म 1925 स*** गोव्यात हडफडे या गावात झाला. वेंगुर्ला तालुक्यातील आरवली हे त्यांचे मूळ गाव, वेतोबा हे त्यांचे आराध्य ग्रामदैवत, त्याच्यावर त्यांचा विश्वास होता ,त्याला ते आपला कर्ता करविता मानायचे.
शालेय शिक्षणानंतर दळवीने टेक्सटाइल इंजीनिअरिंगचा डिप्लोमा करण्यासाठी मुंबईच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण त्या अभ्यासक्रमाची फारशी आवड नसल्याने डिप्लोमा अर्धवट सोडून मुंबईच्या प्रभात दैनिकात ते रुजू झाले. पुढे त्यांनी साहित्यात एम ए केलं. आणि अमेरिकन सरकारच्या माहिती खात्यात नोकरी स्वीकारली. लेखनासाठी पूर्ण वेळ मिळावा म्हणून त्यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली.
ठणठणपाळ या नावाचे उपहासात्मक सदर त्यांनी अनेक वर्ष चालविले.
चक्र ही त्यांची पहिलीच कादंबरी, मराठी साहित्य क्षेत्राच्या अनुभव कक्षा वाढविणारी, अगदी वेगळ्याच विषयावर लिहिलेली म्हणून वाखाणली गेली.
मुंबईतील झोपडपट्टीत बकाल वातावरणात, अत्यंत गलिच्छ जीवन जगणारे, गरिबीमुळे सहन कराव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, पोलिसांची भीती, आणि पोटापाण्याची भ्रांत, अशा अवस्थेत कसतरी जीवन रेटत राहणाऱ्या लोकांची ही कथा आहे. अन्न ,पाणी, निवारा ,यांची कशीबशी तजबीज करून हे लोक जीवन जगत आहेत.
झोपडपट्टीतील या जीवघेण्या संघर्षाचे आणि किळसवाण्या जगण्याचे अतिशय प्रत्येयकारी वर्णन दळवी आपल्या कादंबरीतून करतात.
कामधंद्याच्या शोधात असणारा तरुण रिकाम टेकडा मुलगा बेनवा
मजुरी करणारी त्याची आईआम्मा
वस्तीतून हद्दपार केलेला गुंड लुका
ही या कादंबरीतील मुख्य पात्रे
सुरुवातीला काचेच्या कारखान्यातील नोकरी गेल्यामुळे बेनवा रिकामटेकडा बसला आहे. कारखान्याच्या मालकाने मारहाण केल्याने त्याचा कान सुजला आहे. आणि त्याचा थकलेला पगारही मिळण्याची काही आशा नाही.
दळवी लिहितात की…..
विजेच्या दिव्याच्या लोखंडी खांबाला पाठ लावून बेनवा स्वस्त बसला होता. फूटपाथच्या कडेला पाय सोडून एकटाच बसला होता. डोळ्यातली नजर गेल्यासारखा कुठेतरी पाहत होता. त्याच्या दोन्ही पायांच्या खालून गटार वाहत होते, तांदूळ धुतलेल्या पाण्यासारखे पांडुरक गढूळ पाणी, संथ संथ सरकत होतं. दोन हाताच्या अंतरावर एक म्हातारी कडवट तोंड करून आठ दहा वर्षाच्या पोरीच्या जटा साबणाच्या तुकड्याने घासून धूत होती.
वस्तीतल्या झोपड्या उकिरड्या बसल्यासारख्या दिसत होत्या. बारक्या बारक्या काटकोळ्यानी कंबरभर उंचीच्या झोपड्या तोलून सावरून धरल्या होत्या. क्वचितच एखाद दुसऱ्या झोपडीवर भोक पडलेल्या पत्र्याचे तुकडे होते. बाकी झोपड्या कशाबशा शाकारल्या होत्या. याच वातावरणात वाढलेला बेनवा परिस्थितीशी नमत्त घेणारा आहे. शिक्षण नाही, नोकरी नाही, अम्मा दारूच्या अड्ड्यावर काम करू देत नाही,अशा परिस्थितीत तो रस्त्याच्या कडेला बसून बूट पॉलिश करायला ही तयार असतो. आपल्या आयुष्यात कधी चांगली परिस्थिती येईल अशी खोटी आशा त्याला मुळी सुद्धा नसते.
पण त्याची आई अम्मा मात्र उराशी एक स्वप्न बाळगून आहे. मुळात कर्नाटकातून आलेल्या अम्मानी आयुष्यात पूर्वी चांगले दिवस पाहिले आहेत. आणि छोटसं का असेना पण स्वतःच खोपटअसावं असं तिला फार वाटे. परिस्थितीशी तडजोड करून तीही राहते आहे. मेलेल्या नवऱ्याची आठवण मनात उराशी जपून, तिने ट्रक वाल्याशी संबंध ठेवले आहेत. त्याच्यासारखं गोरगोमट मूल जन्माला घालण्याची तिची इच्छा आहे. शिवाय लुकावरही तिचा जीव आहे. अडीअडचणीला मदत करणाऱ्या या गुंडाला देखील तिने आपलंसं करून ठेवलं आहे.
अम्माचा पूर्व इतिहास सांगताना दळवी लिहितात… पॉंडिचेरीच नाव निघताच अम्माचं मन आठवणीत अडकलं. ताटलीला चिकटलेला मसाला बोटानी निपटून काढतं आणि ते बोट चोखत ती आठवू लागली,
पॉंडिचेरीच नाव क्वचितच तिच्या तोंडून निघायचं आणि ते निघालं की ती आपोआप अबोल व्हायची. अनेक कडू गोड आठवणीनी तिचं मन भरून यायचं. गोडआठवणीनी तिचा जीव तरंगल्यासारखा व्हायचा. पाठोपाठ कडवट आठवणी मोहोळ फुटल्या सारख्या डसायच्या. जीवाची तगमग व्हायची मन आगीत पडल्यासारखं होरपळायचं.
आणि मग झालं गेलं सारं विसरून जाण्यासाठी ती धडपडायची…
याच वस्तीतून बाहेर पडलेला लुका गुंड आहे. दंगल झाली तर दुकाने लुटणारा, काच कारखान्यातील शेटला चाकू दाखवून त्याच्याकडून बेनवाचा पगार वसूल करणारा, भागी वेशेकडे जाणारा, लफंगा आहे. पण काम धंदा त्याच्याकडेही नाही. कादंबरीच्या सुरुवातीला मस्तवालपणे जगणारा लुका , शेवटी गुप्तरोगाने खंगत जातो. औषधांसाठी इंजेक्शन साठी दुकान फोडतो, आणि पोलीस मागे लागले म्हणून अम्माच्या आश्रयाला येतो. आणि अनवधनाने स्वतःबरोबर बेनवाचे आयुष्य उध्वस्त करतो.
देशाच्या कानाकोपऱ्यातून योगायोगाने एकत्र आलेली ही माणसे आहेत. रोजच्या मूलभूत गरजांसाठी धडपडताना सभ्य संस्कृतीचे परिमाण आपल्या आयुष्यात जपणे त्यांना शक्य नाही.
मानवी हक्क ,कायदा ,या गोष्टी त्यांच्या दृष्टीने अशक्यप्राय आहेत. तरी पण त्यांच्या त्या जगण्याचे देखील काही विशिष्ट संकेत आहेत काही मूल्य आहेत.
रस्त्याच्या कामावर असताना बाळंत झालेल्या लक्ष्मीला अम्मा टॅक्सी करून घरी आणते. तिच्यासाठी कोंबडीचा रस्सा करून पाठवून देते. आम्माच्या इच्छे खातर अण्णा दोन खणाची झोपडी बांधतो. पन्ना मेल्यावर बेनवा त्याचा अंत्यसंस्कार करतो
छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणारे, शिवीगाळ करणारे आणि वासनांच्या आहारी जाणारे वस्तीतील लोक, माणुसकी पूर्णपणे विसरलेले नाहीत.
झोपडपट्टीतील जीवनाच्या संघर्षाचे आणि तिथल्या किळस वाण्या अस्तित्वाचे, हे असे अतिशय प्रत्येयकारी चित्रण दळवी वर्णन करतात.
कादंबरीतील पात्रांच्या स्वप्नांचे, क्वचितच दिसणाऱ्या माणूसकीचे, वर्णन करताना देखील ते कधीही त्याला गोंडस रूप देत नाहीत.
झोपडपट्टीतील वास्तव ,तिथले अत्याचार, तिथल्या माणसांची परवशता, याचे प्रभावी चित्रण दळवी या कादंबरीत करतात.
असे कमालीचे रोगट, लाचारीचे पशुवत जीवन ,जगणाऱ्या पात्रांचा पट दळवी या कादंबरीत उभा करतात. या पात्रांना आपलं जीवन घडवता तर येत नाहीच पण किती धडपड करून ते थोडे फार स्थिर करण्याचे त्यांचे प्रयत्न देखील धुळीस मिळतात.
अम्माच्या नव्या झोपडीवर धाड घालून पोलीस ती पाडून टाकतात. त्या झटापटीत तिचा गर्भपात होतो आणि बेनवाला त्याचा काहीही गुन्हा नसताना तुरुंगवास होतो. वस्तीतील लोकांची छोटी छोटी स्वप्न देखील चिरडली जातात.
मराठी साहित्यात इतक्या प्रखरपणे कधी चित्रीत न झालेल्या झोपडपट्टीतील वास्तवावर आधारित चक्र ही कादंबरी अभूतपूर्व ठरली .
सौ स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग

