वैभववाडी हे जंक्शन करण्याचा मानस – नारायण राणे
बजेटची तरतूद बाकी, प्रश्न लवकरच मार्गी लावणार…
वैभववाडी
वैभववाडी हे जंक्शन करण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे चा संपूर्ण सर्वे झालेला आहे. आता फक्त बजेटची तरतूद बाकी आहे आणि त्यासाठी रेल्वे मंत्री वैष्णव यांच्याशी संपर्कात असुन हा प्रश्न मी मार्गी लावल्या शिवाय शांत बसणार नाही. वैभववाडीचा सर्वांगीण विकास व्हावा, हा माझा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार नारायण राणे यांची मुंबई कार्यालयात भेट घेऊन १३ मे ला संघटनेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपोषणाचे निवेदन देण्यात आले. यावेळी ते पदाधिकाऱ्यांशी बोलत होते. यावेळी येथील रेल्वे स्थानक येथे किमान २ जलद गाड्यांना थांब मिळावा, रिझर्वेशन सुविधा सुरु व्हावी, वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत आपण प्रयत्नात आहे. वैभववाडी तालुक्यावर आपले विशेष लक्ष असून येत्या काही वर्षात चित्र वेगळे पाहायला मिळेल. पुढील आठवड्यात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी यांची भेट घेऊन २ जलद रेल्वे गाड्यांना वैभववाडी स्थानकावर थांबवा आणि रिझर्वेशन्स सुविधा तातडीने सुरु करण्याचे आश्वासन राणे यांनी दिले.
यावेळी रेल्वे संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत मुद्रस, उपाध्यक्ष एकनाथ दळवी, विठ्ठल तळेकर, श्रीकृष्ण सोनार, दिपक नारकर, रघुनाथ कोकाटे , चंद्रकांत रासम, सुभाष कर्पे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

