*सावंतवाडीतील जिल्हास्तरीय साहित्य संमेलनातून साहित्य चळवळ अधिक व्यापकतेने पुढे जाईल:- मधुभाई मंगेश कर्णिक यांचे मनोगत*
कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन २२ मार्च २०२५ रोजी सुंदरवाडीच्या पुण्यश्लोक बापूसाहेब नगरीत पार पडले. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधुभाई येणार अशी खात्री असल्याने प्रत्येकाच्या मनात आनंद लहरी उमटत होत्या. वयाच्या ९५ व्या वर्षात पदार्पण करीत असताना सुद्धा साहित्य सेवेत संपूर्ण समर्पण देणाऱ्या मधुभाईंना एक नजर पाहण्यासाठी, खास भेटण्यासाठी त्यांचे चाहते दूर दूरवरून आले होते. परंतु अचानक प्रकृती बिघडल्याने मधुभाईंना संमेलनास येता आले नव्हते. रत्नागिरी येथील कार्यक्रमासाठी आले असता “साहित्य संमेलनाला मला यायचेच होते पण, प्रकृतीने साथ दिली नसल्याने उपस्थित राहता आले नाही याचे खरेच वाईट वाटते, माझ्या दृष्टीने या साहित्य संमेलनास उपस्थित राहणे फार महत्त्वाचे होते” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कोमसापच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी व सावंतवाडी शाखा यांनी उत्कृष्ट असे साहित्य संमेलन आयोजित करून नियोजनबद्धरित्या पार पाडले यासाठी मधुभाईंनी सर्वांचे कौतुक केले आणि या साहित्य संमेलनातून साहित्य चळवळ अधिक व्यापकतेने पुढे जाईल असे मनोगत व्यक्त केले. सावंतवाडी येथे पार पडलेल्या संमेलनात मधुभाईंना सन्मानित करण्यात येणार होते. परंतु रत्नागिरी मालगुंड येथील “पुस्तकांचे गाव” कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिलेल्या मधुभाईंचा सन्मान सोहळा जिल्हा व सावंतवाडी शाखेच्या वतीने सदर कार्यक्रमात सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या हस्ते पार पाडण्यात आला. यावेळी कोमसापच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ.नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ, कुडाळ तालुका सचिव सुरेश पवार, ॲड. मंदार मसके आदी उपस्थित होते.
सावंतवाडीच्या पुण्यनगरीत पार पडलेल्या या संमेलनाला पालकमंत्री नाम.नितेश राणे यांनी उद्घाटक म्हणून उपस्थित राहून साहित्य चळवळ पुढे नेण्याच्या दृष्टीने जी काही वचने दिली आहेत ती ते निश्चितपणे पाळतील आणि साहित्य चळवळ पुढे नेण्यास मदत करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

