कुडाळ :
छोट्या व्यावसायिकांना आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कोकण समर फेस्टिवल २०२५’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान नगरपंचायत पटांगण, बाजारपेठ, कुडाळ येथे संध्याकाळी ४ ते रात्री १० या वेळेत हा महोत्सव रंगणार आहे.
लघुउद्योग, गृहउद्योग आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कोकणातील युवा कलाकारांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक मोनाली वर्दम, गौरी सावंत, हर्षदा पडते, अपर्णा शिरसाठ यांनी केले आहे.
प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष असून, यामध्ये कोकणासह मुंबई-पुणे परिसरातून आलेले सहभागी खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, मसाले, दागिने, कपडे, कोकणी मेवा, चटया, पुस्तके, घरगुती उत्पादने इत्यादी प्रकारांचे स्टॉल्स लावणार आहेत. खास आकर्षण म्हणून जिवंत सशांची विक्री देखील केली जाणार आहे.
युवांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या चित्रकला, हस्तकला, हस्तनिर्मित वस्तू यांचे प्रदर्शन आणि विक्रीसुद्धा या महोत्सवात होणार आहे.
कार्यक्रमांची रूपरेषा:
२५ एप्रिल : शिरोड्यातील अनिता कराओके यांचा लाईव्ह सिंगिंग शो
२६ एप्रिल : लहान मुलांसाठी किड्स टॅलेंट शो स्पर्धा व सावंतवाडीतील सई नाटेकर आणि मुग्धा टोपले यांची शिवकालीन युद्धकला सादरीकरण, महिलांसाठी फनी गेम्स
२७ एप्रिल : सर्व वयोगटातील जोड्यांसाठी ‘जोडी नंबर १’ डान्स स्पर्धा
तसेच, लहान मुलांसाठी गेमिंग झोन चीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या फेस्टिवलमुळे मनोरंजन, खरेदी आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद – हे सर्व एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

