*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चैत्र पालवी…*
चैत्र पालवी खुलून आली,
वठलेल्या त्या झाडावरती!
ग्रीष्म झळांनी सुकून गेल्या,
करड्या पिवळ्या फांद्यांवरती!.
आकाशातून रवी ओकतो,
सहस्त्र किरणांनी ती आग!
प्रतीक्षेत त्या येईल कधी,
सृष्टीतील सृजनाला जाग !..
नभात दिसती चुकार ढग हे,
शामल शुभ्र न् विखुरलेले!
अंतर ते क्षणी भरून येईल,
जलथेंबांनी ओथंबलेले !..
एक दिवस अन् नक्कीच येईल
विंझणवारा घालीत सृष्टीवरी
तहानलेला भवताल सारा,
अधीर प्राशण्या जल अधरावरी!
शांत सजल हे रूपदेखणे,
सृष्टीस मिळण्या वाट पाहते!
चैत्र पालवी आतुरलेली,
गंधीत रंगीत फुलून येते !
उज्वला सहस्रबुद्धे

