परवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी कवी श्रेष्ठ श्री सुरेश भटांच्या जयंती उत्सव साजरा करण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री गजानन पुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली. आणि या सभेमध्ये कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट यांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे ठरले. याचा वृत्तांत देण्यासाठी मी अमरावतीच्या हनुमान व्यायाम शाळेमध्ये पोहोचलो. या व्यायाम शाळेने पूर्ण जगात नाव कमावले आहे. त्याचे प्रमुख व अमरावतीचे भूषण श्री प्रभाकरराव वैद्य यांचे भेट घेतली. ते म्हणाले मी कार्यक्रमाला येतो. त्यांचे वय 90 च्या वर आहे. मी त्यांना विनंती केली मी तुम्हाला फक्त अहवाल सादर करण्यासाठी आलो आहे. तुम्ही कार्यक्रमाला येऊ नये कारण की तुम्हाला काही दुखापत वगैरे झाली तर चांगले होणार नाही. प्रभाकरराव वैद्य म्हणाले मला काही दुखापत वगैरे होत नाही. मी चांगला ठणठणीत आहे .मी कार्यक्रमाला येणार म्हणजे येणारच. कारण सुरेश भटांनी माझ्यावर आणि मी सुरेश भटांवर मनापासून प्रेम केलेले आहे आणि हे खरेच आहे .त्याचा मी जिवंत साक्षीदार आहे. सर्वश्री अरविंद ढवळे डॉक्टर मोतीलाल राठी रामदास भाई श्राफ दादा इंगळे वली सिद्धीकी आणि प्रभाकरराव वैद्य यांनी खऱ्या अर्थाने सुरेश भटांना त्यांच्या पडत्या काळात मदत केली म्हणून सुरेश भट कवितेच्या प्रांतामध्ये एवढी मोठी भरारी घेऊ शकले. परवा अमरावतीच्या
दैनिक हिंदुस्थानचा अमृत महोत्सव दि.30 ऑगस्ट पासून धुमधडाक्यात संपन्न झाला. या कार्यक्रमात दैनिकं हिंदुस्थान ने एक चांगला पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे .तो म्हणजे अमरावती मधील दोन मान्यवरांचा सत्कार. त्यांनी ह्या दोन व्यक्ती अशा निवडल्या की त्या सर्वमान्य आहेत. खऱ्या अर्थाने आदरणीय आहेत आणि कर्तृत्वशीलही आहेत. या ना त्या निमित्ताने या दोन्हीही व्यक्ती माझ्या अति परिचयातील आहेत. मी जेव्हा जेव्हा दुसऱ्या प्रांतात व्याख्यानाला जातो तेव्हा मी अमरावती वरून आलो आहे हे सांगताच त्या प्रांतातील लोक तात्काळ हनुमान व्यायाम शाळेचे नाव काढतात .आज हनुमान व्यायाम शाळेची कीर्ती संपूर्ण भारतात पसरलेली आहे. प्रत्येक प्रांतात त्यांचे विद्यार्थी आहेत. ही किमया साधली आहे ती प्रभाकरराव वैद्य यांनी. आपल्या वडिलांचा वारसा ते समर्थपणे पुढे चालवीत आहेत. मी साहित्यिक असल्यामुळे त्यांचा माझा बरेच वेळा संपर्क आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जेव्हा हनुमान व्यायाम शाळेत झाले तेव्हा मी आयोजन समितीमध्ये होतो. प्रभाकररावची शिस्त दरारा व अचूक नियोजन यामुळे ते संमेलन खऱ्या अर्थाने मैलाचा दगड ठरून गेले. संमेलने खूप झाले असतील. पण अमरावती सारखे संमेलन त्या काळात आपले नाव कोरून गेले. मी जेव्हा जेव्हा प्रभाकरराव यांना भेटलो प्रत्येक वेळेस ते माझे कौतुकच करायचे. मला म्हणायचे काठोळे मला लोक तुमच्याविषयी भलंबुरे सांगतात .पण मी त्यांना लगेच म्हणतो .अरे तो माणूस काही ना काही करीत आहे ना .जो करणारा आहे तो चुकणारच. तुम्ही काम करा. मी तुमच्या पाठीशी उभा आहे .12 मे 2000 रोजी आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीची स्थापना केली. प्रभाकररावांना भेटलो. प्रभाकरराव म्हणाले मला पुस्तकांची यादी द्या. मी ती सगळी पुस्तके बोलावून देतो. आम्ही वरुडला बहुजन साहित्य संमेलन घेतले होते. 1994 ची ती गोष्ट. श्री हर्षवर्धन देशमुख तेव्हा स्वागत अध्यक्ष होते. मी प्रभाकररावाकडे गेलो. एका जेवणाचा खर्च तेव्हा पंधरा हजार रुपये होता. प्रभाकर रावांनी तो उचलला आणि मला सांगितले काठोळे तुम्ही या संमेलनामध्ये प्रस्थापिताविरुद्ध बोलणार आहात हे मला माहित आहे. माझ्या लोकांनीही मला सांगितले आहे. पण मी तुम्हाला मदत करणार आहे. कारण तुम्ही काम करीत आहात आणि करीत राहणार आहेत. मलाही अभिमान वाटला. प्रभाकरराव एवढ्यावरच थांबले नाहीत मला म्हणाले काठोळ कमी पैसे पडले तर मला सांगायचं .अजून मी देईल.. आम्ही पंजाबराव देशमुख त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त युग निर्माता नावाचे नाटक बसवले. 1998 सालची गोष्ट. प्रचंड खर्च होता आणि प्रभाकररावाकडे गेलो. ते म्हणाले श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री वसंतराव धोत्रे यांनी किती पैसे दिले ? त्यापेक्षा मोठ्या आकडा माझा लिहा आणि त्यांनी त्यांचे ड्रॉवर उघडले . ड्रावर माझ्यासमोर ठेवला आणि मला म्हणाले यात जेवढे पैसे आहेत. तेवढे सगळे घेऊन जा. रक्कम बरीच मोठी होती. मी त्यांना म्हटले सर ही रक्कम बरीच मोठी आहे. सर मला म्हणाले पंजाबराव या रकमेपेक्षा कितीतरी मोठे आहेत. तुम्ही सगळे रक्कम घेऊन जा. त्या काळात एवढी उदार देणगी देणारे प्रभाकरराव वैद्य त्यामुळे माझ्या डायरीत कायमचे लिहिल्या गेले आहेत.. सुरेश भटांमुळे मला वारंवार वैद्य सरांकडे जावे लागत होते. सुरेश भटांचा मुक्कामही बऱ्याच वेळा हनुमान व्यायाम शाळेतच असायचा. भट साहेबांना पैशाची गरज जाणवली कि मला फोन यायचा. जा प्रभाकरला भेट. मी वैद्य सरांना भेटायचा. त्यांनी दिलेली मदत मी भट साहेबांना पोहोचति करायचा. सुरेश भटांवर खऱ्या अर्थाने प्रेम करणारी जी माणसे आहेत त्यामध्ये प्रभाकर राव वैद्य यांचां वरचा क्रमांक आहे .सुरेश भटांचे राहणे जाणे येणे टॅक्सी सगळं प्रभाकरराव पाहायचे .ड्रायव्हरला सांगायचे या साहेबांना पेट्रोल साठी पैसे मागायचे नाहीत आणि हे साहेब जोपर्यंत तू अमरावतीला परत जा असे म्हणत नाहीत तोपर्यंत तू गाडी परत घेऊन यायचे नाही. एवढे हे प्रेम.. प्रभाकरराव आणि मी सुरेश भटांचा मोठा सत्कार अमरावतीला घेण्याचे ठरविले होते. आशा भोसले यांनी होकार दिला होता. उन्हाळ्याचे दिवस होते. सुरेश भटांचा वाढदिवस 15 एप्रिलचा . प्रभाकरराव मला म्हणाले आपण हा वाढदिवस दिवाळीनंतर घेऊ. आता आमच्या परीक्षा सुरू आहेत. वातावरण अनुकूल नाही .दिवाळीनंतर वातावरण छान राहते. आपण तेव्हा नियोजन करू. पण अमरावतीला हा जंगी सत्कार सुरेश भटांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे होऊ शकला नाही. ही खंत त्यांनाही आहे आणि मलाही आहे. मी सुरेश भटा वर कॉफी टेबल बुक तयार करायचे ठरविले. त्याचा एक नमुना मी वैद्य सरांना दाखवायला नेला. आणि तोंड भरून कौतुक केले. काठोळे किती पैसे पाहिजेत ? एवढे सांगा. एवढे मला विचारले. मी नम्रपणे नकार दिला. आणि म्हणालो सर आम्ही आता खऱ्या अर्थाने समर्थ झालेलो आहोत. फक्त तुमचा आशीर्वाद द्या. असा हा अमरावतीवर खऱ्या अर्थाने मनापासून हृदयापासून प्रेम करणारा माणूस. या माणसाची पद्मश्री पुरस्कार व सत्कारासाठी केंद्र शासनाने निवड करुन एक सुवर्ण मध्य साधला आहे .त्यानिमित्त आयोजकांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनतेने त्यांना हृदयापासून पद्मश्री नव्हे महाराष्ट्र भूषण मनोमन दिला खऱ्या अर्थाने तन-मन-धनाने हनुमान व्यायाम शाळा अमरावती यासाठी त्यांनी आपले जीवन अर्पित केले अशा या समर्पित व्यक्तिमत्वाला हृदयापासून प्रणाम.
प्रा. डॉ नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती 9890967003

