सावंतवाडी
असनियेत प्रादेशिक पर्यटन विकास अंतर्गत मंजूर असलेल्या रस्त्याच्या अत्यावश्यक कामास येत्या चार दिवसात सुरुवात करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता श्री माने यांनी दिल्याने 26 जानेवारी रोजी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर असनिये येथील बाळकृष्ण सावंत आणि ग्रामस्थांनी पुकारलेले बेमुदत उपोषण मंगळवारी दुपारी स्थगित केले.
असनियेतील नियोजित पर्यटन प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यासह ग्रामस्थांच्या सोयीसाठी या रस्त्यासाठी निधी मंजूर असुन वर्ग ऑर्डरही निघाली होती. त्यानंतर कामही सुरू झाले होते. दरम्यान रस्ता डांबरीकरणाचे हे काम रखडल्याने रस्त्याभावी लोकांच्या गैरसोयीसह पर्यटन प्रकल्पही रखडला आहे. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी बाळकृष्ण सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषण छेडले होते. यावेळी कार्यकारी अभियंता श्री माने उपोषणकर्त्यांची चर्चा केली आणि योजनेतर्गत मंजूर असलेल्या रस्त्यापैकी अत्यावश्यक असलेल्या रस्त्याची शुक्रवारी 29 जानेवारी रोजी असनिये गावात जाऊन पाहणी करण्याची ग्वाही देत हे काम चार दिवसात सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी आपले उपोषण स्थगित केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता अनिल आवटी, शाखा अभियंता शितल तर्पे, ठेकेदार अमेय आरोंदेकर, अरुण मोर्ये, सतिशचंद्र मोर्ये, रमेश दळवी, प्रदिप घोगळे, संदीप सावंत, अँड. परेश सावंत आदी उपोषणकर्त्या ग्रामस्थांसह पोलीस कॉन्स्टेबल मयुरंज कमतनुरे, पोलिस गंगाराम येडगे आदी उपस्थित होते.