*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम लेख*
*”कोकणातील साहित्य चळवळ”*
कोकण म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारे अलौकिक निसर्गसौंदर्य..!
एकीकडे सह्याद्रीच्या पर्वत रांगा, डोंगर दऱ्या, जैवविविधतेने नटलेली नैसर्गिक साधनसमृद्धी तर दुसरीकडे पांढऱ्या शुभ्र रेतीच्या किनाऱ्याच्या कुशीत अथांग पसरलेला अरबी समुद्र. महाराष्ट्रातील समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि अमाप निसर्गसंपन्नता लाभलेली ही कोकण भूमी परशुरामाची भूमी म्हणून ओळखली जाते. अशा या वैभवशाली कोकणच्या सौंदर्याने अनेकांना भुरळ घातली आणि त्यातून निरनिराळे साहित्य निर्माण होत गेले. याच कोकणात अनेक चळवळी उभ्या राहिल्या, त्यातील एक म्हणजे साहित्य चळवळ..! इथल्या साहित्य चळवळींचा इतिहास महत्त्वपूर्ण असून त्याला नानाविध साहित्य प्रकारांची आणि थोर साहित्यिकांची पार्श्वभूमी आहे, म्हणून तर कोकणातील साहित्य चळवळ कालही प्रभावी होती, आजही लक्षणीय आहे आणि भविष्यातही नक्कीच उल्लेखनीय योगदान देईल यात यत्किंचितही शंका नाही.
कोकणाने आजही आपले भूतकाळातील अस्तित्व जपले आहे. नमन, जाखडी, ओव्या, भारुडे, लोककथा, दशावतार तेव्हाही प्रचलित होतेच पण, अनेक कला आजही आपले अस्तित्व जपून आहेत. पौराणिक, ऐतिहासिक प्रसंग, कथा लोककलेतून सादर करणारी दशावतार नाट्यकला ही कोकणच्या लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनली आहे. कोकणची कला आणि संस्कृती लोककथा, ओवी, भारुडे, नाट्य, कविता, कथा, कादंबरी मधून व्यक्त झाली आहे. त्यामुळे कोकण हा केवळ निसर्गसंपन्न प्रदेश नसून मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेत महत्त्वाचे योगदान देणारा सुसंस्कृत प्रदेश आहे. लोकसाहित्य, कथा, कविता, कादंबऱ्या आणि नाटकांच्या माध्यमातून कोकणाने मराठी साहित्य समृद्ध केलं आहे.
कोकणातून अनेक नामवंत साहित्यिक उदयास आले आहेत ज्यांनी मराठी साहित्यात मोठे योगदान दिले आहे. यात पहिले नाव घ्यावे लागेल ते केळूस ता.वेंगुर्ला येथील कृ. अ. केळुसकर यांचे.. कारण त्यांनी १९०७ मध्ये ‘क्षत्रियकुलावतंस छत्रपति शिवाजी महाराज यांचे चरित्र’ हा ग्रंथ लिहून मराठी साहित्य चळवळ प्रवाही केली. मराठीमधील समग्र व साधार असलेले छ्त्रपती शिवाजी महाराजांचे हे पहिले चरित्र. त्यानंतर त्यांनी गौतम बुद्ध, तुकाराम यांचीही चरित्र लिहिली होती.
*एक तुतारी द्या मज आणुनि*
फुंकिन मी जी स्वप्राणाने*
*भेदुनि टाकिन सगळी गगनें*
*दीर्ध जिच्या त्या किंकाळीने*
*अशी तुतारी द्या मजलागुनी*
ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढण्याचे आव्हान करणारी देशभक्तीपर कविता लिहिणारे केशवसुत म्हणजे कृष्णाजी केशव दामले..! मालगुंड, जि. रत्नागिरी हे त्यांचे जन्मस्थान. सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल मध्ये त्यांनी अध्ययन केले होते. वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते. आम्ही कोण?, नवा शिपाई, संध्याकाळ, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण अशा कितीतरी त्यांच्या उल्लेखनीय कविता आहेत. सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर बसून त्यांनी कविता रचल्या होत्या. आजही त्यांच्या स्मृती स्मारक रूपाने तिथे जिवंत ठेवल्या आहेत.
साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा किंवा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेते वि. स. खांडेकर म्हणजे कोकणचा अभिमान..! त्यांनी त्यांच्या साहित्यात आर्थिक विषमता, ध्येयवादी व्यक्तींचे वैफल्य, दलितांवर होणारा अन्याय, दांभिकता दाखवून साहित्यात सामाजिक आशय आणला. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, १६ कादंबऱ्या लिहिल्या परंतु “ययाति” ने त्यांना अजरामर केले. सिंधुदुर्गातील शिरोडा येथे त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली होती. आरवली येथे त्यांचे घर आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ हे पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांचे गाव. रत्नागिरी येथे १९९० मध्ये झालेल्या साहित्य संमेलनानंतर तत्कालीन संमेलनाध्यक्ष पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी कोकण मराठी साहित्य परिषदची स्थापना केली. याचाच परिणाम म्हणजे कोकणातील गाव खेडे, वाडी वस्त्यांमधील संवेदना, जाणिवा जपणाऱ्या मनांनी हाती लेखणी धरली अन् कितीतरी हात लिहिते झाले, अनेक लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार, लालित्यकार साहित्यिक जन्मास आले. मधुभाईंच्याच पुढाकाराने कितीतरी साहित्य संमेलने कोकणात झाली. अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवले गेले. कोमसापची केंद्रीय संमेलने, राज्यस्तरीय महिला संमेलने, युवा साहित्य संमेलन, बालसाहित्य संमेलने, ग्रामीण साहित्य संमेलने भरवली गेली. १९५८ साली “कोकणी गं वस्ती” या पहिल्या कथा संग्रहापासून सुरू झालेला मधुभाईंचा साहित्य प्रवास सातत्याने सुरू आहे. “माहीमची खाडी” मधून त्यांनी मुंबईतील झोपडपट्टीतील माणसांचे जीवन रेखाटले आहे. जैतापूर येथील अणुभट्टीवर लिहिलेले “लाल बत्ती” तर चांगलेच गाजले. मधुभाईंच्या साहित्यात मानवी जीवन, मानवी स्वभाव आणि कोकणातील निसर्गाचे कौतुक आवर्जून पहायला मिळते. कोमसापची स्थापना करून त्यांनी कोकणात लेखन आणि वाचन चळवळीला एक वेगळी दिशा दिली आहे. वयाची ९५ वर्षे पार करत असताना देखील साहित्यावर असलेले त्यांचे प्रेम, ओढ आणि तळमळ नक्कीच भावी पिढीला प्रेरणादायीच..!
कोकणातील साहित्यिक असा जेव्हा विषय येतो तेव्हा जयवंत दळवी हे नाव कुणीही विसरू शकणार नाही. वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा जवळील आरवली हे त्यांचे गाव. त्यांनी कथा, कादंबरी, नाटके या साहित्य प्रकारात चक्र, महानंदा, संध्याछाया, बॅरिस्टर, पुरुष, सारे प्रवासी घडीचे अशी लोकप्रिय पुस्तके लिहिली. “चक्र” मधून त्यांनी झोपडपट्टीचे जीवन चित्रित केलं तर “बाजार” या त्यांच्या कादंबरी मधून घरच्या जिण्यापेक्षा बाजारातील जिणे सुसह्य वाटणारा नायक आणि मुंबईतील बाजार चितारला आहे. “अधांतरी” या कादंबरी मधून दळवींनी “दुःखाकडून सुखाकडे जाऊ इच्छिणे ठीक परंतु सुखाकडून अधिकच्या सुखाकडे जाण्याचा हव्यास नेहमी त्रासदायक ठरतो” हे सूत्र सांगितले आहे. “ठणठणपाळ” या टोपण नावाने त्यांनी “घटका गेली पळें गेली” हे सदर चालविले होते. सिंधुदुर्गातील शिरोडा जवळील आरवली येथे जयवंत दळवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. स. खांडेकर एकाच वाडीत राहत होते हे विशेष..! आजही शिरोडा येथे त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत हे वाखाणण्याजोगे..!
*ये रे घना ये रे घना…. न्हाउ घाल माझ्या मना …*
*ती येते आणिक जाते, येतांना कधि कळ्या आणिते*
*नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत*
*तू तेव्हा तशी…तू तेव्हा अशी..*
*कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे…*
अशा मनभावन काव्यांचे रचिते साहित्यिक चिं. त्र्यं. खानोलकर (आरती प्रभू) हे मूळचे तेंडोली, वेंगुर्ला येथील. प्रतिभासंपन्न कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी नाटक, कादंबरी व कथेच्या क्षेत्रात कोकणातील दंतकथा व गूढता यांचा प्रभावी वापर केला. त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध झाले त्यातील “कोंडुरा” ही त्यांची गाजलेली कादंबरी तर “जोगवा” हा पहिला काव्यसंग्रह. त्यांनी अनेक नाटके लिहिली पण आधुनिक भारतीय रंगभूमीवर ‘एक शून्य बाजीराव’ हे त्यांचे एक महत्त्वाचे नाटक आहे. चाफा आणि देवाची आई, राणी पाखरू, सनई असे कथासंग्रह प्रसिद्ध झालेत.
शालेय शिक्षण नाही आणि व्यवसाय भिक्षुकी..तरीही तब्बल १२०० कथा आणि ५४ कादंबऱ्या लिहिणारे लेखक म्हणजे शब्दप्रभू श्रीपाद काळे. थोर साहित्यिक रवींद्र पिंगे त्यांचे खास मित्र. जगदीश खेबुडकर, शं. ना. नवरे, शंकर वैद्य, मधू मंगेश कर्णिक यांनी देवगड तालुक्यातील वाडा गावात आपली पायधूळ झाडली ती केवळ श्रीपाद काळेंना भेटण्यासाठी..! एवढी शब्दश्रीमंती त्यांची होती. “पिसाट वारा” या त्यांच्या कादंबरीला राज्य पुरस्कार मिळाला होता.
“ठेय झिला घराची आठव रे। पाच तरी रुपये पाठंय रे’’, अशी कविता लिहिणारे वि. कृ. नेरुरकर हे मालवणीतले पहिले कवी. त्यांनी चाकरमानी आणि त्यांच्या मनीऑर्डरची वाट पाहणारे घरवाले यांचे हृदयस्पर्शी चित्र या कवितेतून मांडले आहे. वि. कृ. नेरुरकर हे श्रीमंत शिवरामराजे भोसले यांचे गुरू आणि सावंतवाडी संस्थानात ते शिक्षणाधिकारी म्हणून ही रुजू होते.
नेरूर ता. कुडाळ येथील प्र. श्री. नेरुरकर यांनी कादंबरी, नाटक, बाल साहित्य, प्रवासवर्णन, चरित्रे साकारली. त्यांनी मालवणी बोलीवर देखील संशोधन केले.
मालवण कोळंब येथील साहित्यिक आ. ना. पेडणेकर यांनी कोकणातील प्रादेशिक जीवनाचे वास्तवपूर्ण चित्रण, विशेषतः कोकणातील माणसे, सांस्कृतिक लोकजीवन, समुद्र, कोकणातील निसर्ग, मालवणी बोली आणि तेथील मानवी जीवनाचा अनुबंध त्यांनी शेलूकमध्ये गुंफला आहे. रेडग्रीन, मैत्र, वेडा आंबा यामधून त्यांनी सामाजिक विकृतीचा निषेध केला आहे.
सावंतवाडीचे साहित्यिक कोकणभूषण विद्याधर भागवत हे आरती मासिकच्या संपादनाबरोबरच कविता, कथा, कादंबरी, नभोनाट्य, बालसाहित्य, साहित्य समीक्षा व चरित्रलेखन करीत असत. ते तर साक्षात ‘विद्यां धारयति इति विद्याधर:। ‘ असे नाव सार्थ करणारे होते. ‘सागरवेला’ हा विद्याधर भागवत यांचा प्रथम आणि ‘कवितेच्या कविता’ हा अंतिम काव्यसंग्रह. यानंतर त्यांनी ललित, कथा, कादंबऱ्या, बालवाङ्मय, एकांकिका आदी विपुल लेखन केलं.
डॉ. विद्याधर करंदीकर हे कणकवलीचे. ते व्यवसायाने दंतवैद्यक, पण साहित्यातील मुशाफिरी त्यांनी लीलया पेलली, ती मराठी आणि संस्कृत भाषेबद्दल असलेल्या अंगभूत ओढीमुळेच. त्यांनी कवितासंग्रह, मालवणी एकांकिका तसेच केशवसुत, वीर सावरकर यांची चरित्रे लिहिली.
मालवण येथे जन्मलेले लुई फर्नांडिस यांच्या साध्या सरळ शैलीतील कथांमधून राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्य, ध्येयनिष्ठ आणि धर्मनिरपेक्षता व्यक्त झालेली पहायला मिळते.
वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथे जन्मलेले कोकण आयकॉन कवी प्रा.डॉ.वसंत सावंत हे सावंतवाडीच्या पंचम खेमराज महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्ययन करायचे त्याचबरोबर ते सुप्रसिद्ध कवी होते. निसर्गकवितामधून ईश्वरीरूपाचा प्रत्यय नोंदविण्याची प्रवृत्ती हे त्यांच्या काव्यलेखनाचे विशेष. ओवी-अभंगासह विविध वृत्तछंदांचा वापर त्यांनी कविता लेखनात केला आहे.
‘धनंजय किर’ या टोपण नावाने लिहिणारे अनंत विठ्ठल किर हे चरित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी भारतातील अनेक नामवंत व महनीय व्यक्तिमत्वांची चरित्रे निर्माण केली. श्रीपाद काळे, हरिहर आठलेकर, ल. मो. बांदेकर, प्रा.अशोक बागवे, अलीकडील मालवणी कवी दादा मडकईकर, गझलकार मधुभाई नानिवडेकर, विजय जोशी(विजो), प्रवीण बांदेकर अशा अनेक जुन्या नव्या लेखकांनी कोकणच्या संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवून लेखन केले. थोडक्यात अनेक थोर साहित्यिकांच्या पदस्पर्शाने कोकणची भूमी पवित्र झाली आहे.
कोकणातील या पवित्र भूमीतील असंख्य नवलेखक आपल्या सृजनशील लेखणीच्या द्वारे आता कथा, कादंबऱ्या, कविता, गझला, चित्रपट कथानक, चित्रवाहिन्यांवरील मालिकांचे लेखन, संहिता लेखन या माध्यमातून कोकणातील साहित्य चळवळीत आपले अमूल्य योगदान देत आहेत. कोकणावर लिहिल्या गेलेल्या पर्यटन, ऐतिहासिक, धार्मिक चालीरीती आदींवरच्या कथा लोकप्रिय होत आहेत. पर्यायाने अलीकडेच मराठी बोलीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा अभिजात राखण्याचा प्रयत्न कोकणातील साहित्यिकांकडून होताना दिसत आहे. ज्या अपेक्षेने मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ कोकणात उभी राहिली ती त्याच जोमाने ती पुढे जात आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सारख्या कितीतरी साहित्यिक संस्था, ज्येष्ठ साहित्यिक लेखणी अबाधित ठेवण्याचा ध्यास घेऊन कोकणातील लिहित्या हातांना बळ देऊन ही साहित्य चळवळ ज्वलंत ठेवत आहेत. त्यामुळे कोकणातील साहित्यिक वाटचाल आशांचे पंख लावून उंच भरारी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून नवनवे साहित्य निर्मितीसाठी शब्दांवर स्वार होऊन मराठी बोलीचे अभिजातत्व टिकवून ठेवतील यात शंकाच नाही..
© दीपक परशुराम पटेकर (दीपी)
सावंतवाडी, ८४४६७४३१९६

