दोन वाहनांपैकी एक वाहन पोलिसांच्या ताब्यात
कुडाळ :
सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणी संशयित आरोपी क्रमांक एक सिद्धेश अशोक शिरसाट याला वैद्यकीय कारणास्तव पोलीस कोठडी आबाधित राखून तात्पुरत्या स्वरूपात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कुडाळ न्यायालयाने दिले आहेत. सिद्धेश शिरसाट आजारी असल्याने पोलीस कोठडीत असतानाही त्याच्या न्यायालयीन कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती. दरम्यान या प्रकरणात वापरण्यात आलेल्या दोन वाहनांपैकी संशयितांनी प्रकाश बिडवलकर यांचा मृतदेह कुडाळ हुन सातार्डाला नेताना वापरलेले वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर याचे अपहरण करून त्याला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह सातार्डा येथे नेऊन जाळण्यात आला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या खून प्रकरणी नियुक्ती पोलिसांनी सिद्धेश अशोक शिरसाठ (४४, रा.कुडाळ), गणेश कृष्णा नार्वेकर (३४, रा.माणगाव), सर्वेश भास्कर केरकर (२९, रा.सातार्डा, ता. सावंतवाडी), अमोल उर्फ वल्लभ श्रीरंग शिरसाट (रा. पिंगुळी ता. कुडाळ) या चौघांना अटक केली होती. सुरुवातीला त्यांना कुडाळ न्यायालयाने १३ एप्रिल पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपताच त्यांना रविवारी १३ एप्रिल रोजी कुडाळ न्यायालयात हजर करण्यात केले असता न्यायालयाने चार पैकी सिद्धेश शिरसाटसह तीन संशयित आरोपींची पोलीस कोठडीची मुदत १५ एप्रिल पर्यंत वाढवून दिले तर चौथा संशयित अमोल शिरसाठ याला वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु संशयित आरोपी क्रमांक एक सिद्धेश अशोक शिरसाठ याची प्रकृती बिघडल्याने त्याची पोलीस कोठडी आबाजी ठेवून त्याच्यावर वैद्यकीय उपचार होण्यासाठी न्यायालयीन देण्याची मागणी आज कुडाळ पोलिसांनी केली. त्याप्रमाणे सिद्धेश शिरसाट यास तात्पुरती न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. सध्या तो जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची तब्येत सुधारली की पोलीस त्याला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकतात अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात दोन वाहनांचा वापर झाला होता. त्यापैकी प्रकाश बिडवलकर यांच्या चेंदवणवरून कुडाळ येथे केलेल्या अपहरणासाठी वापरलेले वाहन अजून पोलिसांना सापडले नसले तरी प्रकाश बिडवलकर याला मारहाण करून त्याचा मृतदेह कुडाळ वरून सातार्डा येथे नेण्यासाठी संशयीतांनी ज्या वाहनाचा वापर केला ते वाहन मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती तापसिक अंमलदार भीमसेन गायकवाड यांनी दिली प्रकाश बिडवलकर खून प्रकरणात आता अजून धागेदोरे पोलीस तपासात हाती येत आहेत. यात आणखीन काही व्यक्ती सहभागी आहेत का त्या दृष्टीने पोलिसांचे तपास सुरू आहे.