*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार यांनी दिग्गज कवी गझलकार श्री.विजय जोशी (विजो) यांच्या “बाया” या कवितेचा वऱ्हाडी भाषेत केलेला अनुवाद*
*बाया*
*विजो (विजय जोशी)*
बाया कपडे धुवायला जातात
नदीवर…
निगुतीने…
सुख-दु:खे बुचकळवतात पाण्यात
आणि बोलतात वाहत्या पाण्याशी सराईतपणे
मनमोकळं…
कपडे घासतात, आपटतात,
धोपटतात दगडावर,
साफ करतात कपड्यांचा मळ आणि मनातली खळबळ सुद्धा…
बायका कुजबुजतात, पुटपुटता, बडबडतात –
आपापसात
मनाशी
कपड्यांशी
पाण्याशी
दगडाशी सुद्धा…
विरघळून जातो सारा शीण
नदीतल्या पाण्यात
आणि
बाया फिरतात माघारी
पुन्हा एका नवीन दिवसाची
सुरुवात करायला –
नदीच्या पात्रागत विस्तीर्ण
आणि स्वच्छ नितळ मनाने…!!
(आगामी ‘अतर्नाद’ संग्रहातून)
◼️◼️◼️
© विजो (विजय जोशी)
डोंबिवली (मालवण-सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२
बाया ….या अत्यंत गाजलेल्या कवितेचा व-हाडी अनुवाद…
बाया कापडं धुवाले जातेत
नदीवरतं
निगुतीनं
सुखदुक बुचकळतेत पान्यामंदी
आन् बोलतेत वाह्यत्या पान्यासंगट
सराईतावानी मनमोकयं.
कापडं घासतेत, आपटतेत
धोपटतेत दगडाव-ही
सफ्फा करतेत कपड्याईतला मैल आन् मनामंधलं उभाड बी…
बाया कुजबुजतेत,पुटपुटतेत,बडबडतेत आपसातनी
मनाशीन
कपड्यांशीन
पान्याशीन आन् दगडाशीन बी
ईरून जाते निक्काल शीन
नदीतल्या पान्यात
आन् बाया फिरते पलटून
पुन्यांदा यका नव्या दिसाची
सुरवात कराले
नदीच्या पात्रावानी लय मोठं पसरलेलं आन् सुद्या निरमळ मनानं…!!
व-हाडी अनुवाद
अरुणा दुद्दलवार ✍️
दिग्रस यवतमाळ