बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सावंतवाडीत रक्तदान शिबिर
तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी केले रक्तदान
सावंतवाडी
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार श्रीधर पाटील होते.
यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल अवधूत, नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी वैभव अंधारे, प्रा. डॉ. देविदास बोर्डे, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, कोलगावचे माजी सरपंच लाडू जाधव, ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव, प्रा. रूपेश पाटील यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी उपस्थित होते.
तहसीलदार श्रीधर पाटील म्हणाले, “रक्तदान हे जगातील सर्वात श्रेष्ठ दान आहे. मात्र संविधानाला पूरक समतेसाठी रक्तात ‘भीमराव’ असणे ही काळाची गरज आहे. बाबासाहेबांचे समतेचे विचारच देशाला तारक आहेत.”
पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनीही निकोप समाजनिर्मितीसाठी सुदृढ समाजाची गरज असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी यावेळी स्वरचित भीम गीत सादर केले.
या शिबिरात तहसीलदार श्रीधर पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखील अवधूत, नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी वैभव अंधारे, प्रसाद बटवाल यांच्यासह ३० जणांनी रक्तदान केले.
समन्वय समितीच्या वतीने सर्व रक्तदात्यांना अल्पोपहार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.