You are currently viewing प्रियांश आर्यचे आक्रमक शतक; चेन्नई सुपर किंग्जचा पराभवाचा चौकार

प्रियांश आर्यचे आक्रमक शतक; चेन्नई सुपर किंग्जचा पराभवाचा चौकार

*प्रियांश आर्यचे आक्रमक शतक; चेन्नई सुपर किंग्जचा पराभवाचा चौकार*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आयपीएल-२०२५ मध्ये पंजाब किंग्जने त्यांच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा १८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने युवा फलंदाज प्रियांश आर्यच्या झंझावाती शतकाच्या जोरावर सहा विकेट्स गमावून २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नईने पूर्ण षटके खेळल्यानंतर पाच विकेट गमावून २०१ धावा केल्या. या हंगामात पंजाबचा घरच्या मैदानावर हा पहिला विजय आहे तर चेन्नईचा सलग चौथा पराभव आहे.
प्रियांशने ४२ चेंडूंत सात चौकार आणि नऊ षटकारांसह १०३ धावांची खेळी केली. त्याने ३९ चेंडूत शतक पूर्ण केले जे आयपीएलमधील पंजाबसाठी दुसरे सर्वात जलद शतक आहे. त्याच्यानंतर शशांक सिंगने ३६ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या. त्याच्या खेळीत त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले.
चेन्नईला जलद सुरुवात हवी होती आणि त्यांनी ती मिळवली. रचिन रवींद्र आणि कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मॅक्सवेलने रचिन रवींद्रला बाद केले. त्याने २३ चेंडूत सहा चौकारांसह ३६ धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाड फक्त एक धाव करू शकला.
चेन्नईला शिवम दुबे आणि कॉनवे यांनी भागीदारीची आवश्यकता होती. दोघांनीही संघाची धावसंख्या १०० च्या पुढे नेली आणि वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. दोघांनीही ८९ धावांची भागीदारी केली. १५ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर दुबेला बाद करून फर्ग्युसनने पंजाबला सामन्यात परत आणले.
त्यानंतर धोनी आला ज्याच्याकडून जलद धावा अपेक्षित होत्या. दरम्यान, १८ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर चेन्नईने कॉनवेला रिटायर आउट केले. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धोनीही बाद झाला. आणि यासोबतच, चेन्नईच्या विजयाच्या आशाही भंगल्या.
तत्पूर्वी, पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रियांशने येताच वादळ निर्माण केले आणि पहिल्याच षटकात १६ धावा केल्या. दुसरा सलामीवीर फलंदाज प्रभसिमरन सिंगला मुकेश चौधरीने त्याचे खातेही उघडू दिले नाही. कर्णधार अय्यरला काही खास करता आले नाही आणि तो नऊ धावा काढून खलीलचा बळी ठरला. खलीलने मार्कस स्टोइनिसलाही तंबूचा रस्ता दाखवला.
गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा नेहल वधेराला अश्विनच्या चेंडूवर धोनीने यष्टीचीत केले. त्याला फक्त नऊ धावा करता आल्या. अश्विनने मॅक्सवेलला त्याच्याच चेंडूवर झेल देऊन पंजाबला पाचवा धक्का दिला. दरम्यान, शतक पूर्ण करणारा प्रियांश सतत धावा करत होता. १४ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नूर अहमदने प्रियांशला बाद केले.
प्रियांशच्या जाण्यानंतर शशांक सिंग आणि मार्को जानसेन यांनी जलद धावा काढल्या. दोघांनीही मोठे फटके मारले. शशांकने ३६ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याच्या खेळीत त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. जानसेनने १९ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांसह ३४ धावांची नाबाद खेळी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा