मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “मराठी साहित्य व कला सेवा”, “राष्ट्रकुट”, “अखिल आगरी साहित्य विकास मंडळ, शाखा – भिवंडी” आणि “शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट” यांच्या संयुक्त विद्यमाने “पहिल्या शिवशौर्य स्पर्धात्मक कविसंमेलनाचे” आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर १ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता, भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारलेल्या मंदिराच्या पवित्र परिसरात अंतिम सादरीकरण होणार आहे.
या कविसंमेलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, स्वराज्यस्थापना, युद्धनीती, राज्यकारभार व प्रेरणादायी घटनांवर आधारित स्वरचित काव्यरचना सादर केल्या जाणार आहेत. स्पर्धात्मक स्वरूपाच्या या संमेलनात सहभागी होणाऱ्या कवींनी १५ एप्रिल २०२५ पर्यंत आपली कविता टंकलिखित आणि ध्वनीमुद्रित स्वरूपात फक्त व्हॉट्सअॅपद्वारे पाठवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाइन पद्धतीने होणार असून २० एप्रिल रोजी निकाल अधिकृत समूहावर जाहीर केला जाईल. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या कवींना प्रत्यक्ष सादरीकरणासाठी निमंत्रण देण्यात येईल. कवितेचे स्वरूप मुक्तछंद, छंदबद्ध, गझल, अभंग, पोवाडा किंवा गीत असे काहीही असू शकते, मात्र ती मराठीतच असावी आणि शिवचरित्राशी स्पष्ट संबंध असावा अशी अट आहे.
या स्पर्धेसाठी विनामूल्य सहभाग तसेच सर्व सहभागी कवींना आकर्षक ऑनलाइन प्रमाणपत्र दिले जाणार असून, अंतिम फेरीतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम अशी पारितोषिके मिळणार आहेत. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी वयोमर्यादा नाही, मात्र मराठी भाषेचे प्रभुत्व आवश्यक आहे.
या ऐतिहासिक उपक्रमाच्या आयोजनासाठी निर्मला मच्छिंद्र पाटील (समन्वयक), गुरुदत्त वाकदेकर (संस्थापक अध्यक्ष – मराठी साहित्य व कला सेवा), प्रकाश ओहळे (संपादक – राष्ट्रकुट), सुनील पाटील (अखिल आगरी साहित्य विकास मंडळ) आणि डॉ. राजूभाऊ चौधरी (संस्थापक अध्यक्ष – शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट) ह्यांनी पुढाकार घेतला आहे.
स्पर्धेशी संबंधित अधिक माहितीसाठी व कविता पाठवण्यासाठी गुरुदत्त वाकदेकर – ९९८७७४६७७६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.