You are currently viewing मुख्यमंत्र्यांसह त्‍यांच्या सहकाऱ्यांनी बाळासाहेबांचे विचार समजून घेण्याची गरज – परशुराम उपरकर 

मुख्यमंत्र्यांसह त्‍यांच्या सहकाऱ्यांनी बाळासाहेबांचे विचार समजून घेण्याची गरज – परशुराम उपरकर 

राज ठाकरेंच्या अयोद्धा दौऱ्यात सिंधुदुर्गातीलही मनसैनिक सहभागी होणार…

कणकवली

आज भारतात प्रखर हिंदुत्ववादी बोलणारा जहाल नेता म्हणून राज ठाकरे हे जनतेला हवे आहेत. राज ठाकरेंच्या या लोकप्रियतेमुळे इतर पक्षांच्या पोटात पोटशूळ आले आहेत. हिंदुत्ववादी नेता म्हणून राज ठाकरेंकडे देशातील जनता पाहत आहे. तर कोणत्याही कारवाईची पर्वा न करता राज ठाकरेही हिंदूत्वासाठी झटत आहेत. त्‍यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आता बाळासाहेब ठाकरेंचे विचार समजून घेण्याची गरज निर्माण झाली असल्‍याचे प्रतिपादन मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी केले. तसेच राज ठाकरेंच्या ५ जूनच्या अयोध्या दौऱ्याला जिल्ह्यातूनही शेकडो मनसैनिक सहभागी होणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस माजी आम. परशुराम उपरकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. परशुराम उपरकर म्हणाले, राज ठाकरे यांनी हनुमान जयंतीच्या औचित्यावर अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. त्यामुळे बाकीचे राजकीय पक्ष देवळात जाऊन आपल्या हिंदुत्वाचे दर्शन घडवत आहेत. ज्या पक्षाची स्थापना खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादासाठी करण्यात आली होती, तो सत्ताधारी शिवसेना पक्ष आता हिंदुत्ववाद सोडून सेक्युलर झाला आहे. बाळासाहेबांच्या जुन्या भाषणांचे व्हिडिओ पाहिले तर त्यातून प्रखर हिंदुत्वाचे दर्शन घडते. बाळासाहेबांचे शरद पवारांशी सलोख्याचे संबंध असले तरी त्यांना बाळासाहेबांनी अनेकदा व्यासपीठावरून सुनावले होते. इटलीहून लग्न करून भारतात आलेल्या सोनिया गांधींना पांढऱ्या पायाची म्हणणारे बाळासाहेबच होते. आज एकत्रित सत्तेत आल्यामुळे सरकार सेक्युलर झाले आहे.

ते म्‍हणाले, अल्पसंख्यांक मंत्र्यांनी मुस्लिम मुलांना शिक्षणासाठी तीन हजार रुपये मासिक मानधन घोषित केले. मात्र इतर धर्मीय मुलं गरीब असूनही त्यांना मानधन दिले जात नाही. हज यात्रेला विमान प्रवासासाठी सवलत दिली जाते. मात्र सर्व हिंदूंना पंढरपूरला जाण्यासाठी एसटीची किंवा इतर प्रवासाची सवलत सरकारने दिली नाही. त्यामुळे एका हिंदुत्ववादी पक्षाने हिंदुत्वाची कास सोडल्यामुळे राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा विषय जो बाळासाहेबांनी उचलून ठरला होता त्याचे समर्थन केल्याने इतरांना डोकेदुखी झाली आहे.

 

खासदार राऊतांची बाळासाहेबांची जुनी भाषणे ऐकावीत

राज ठाकरे हे हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी बाळासाहेबांची जुनी भाषणे ऐकवीत किंवा आम्ही ती त्यांना देतो. त्यावेळी बाळासाहेबांनीही दसरा मेळाव्यात भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. तत्कालीन नेते सरपोतदार यांनी भोंग्यांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. बाळासाहेबांनी रस्त्यावर पडल्या जाणाऱ्या नमाजांविरोधात शिवसैनिकांना आदेश दिले होते की महाआरती करायची. याबाबत खासदार राऊत अज्ञान आहेत का? असही प्रश्‍न श्री.उपरकर यांनी व्यक्‍त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा