You are currently viewing ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन

मुंबई :

देशभक्तीपर चित्रपटासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन झालं आहे. ते ८७ वर्षांचे होते. मुंबईत कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुपेरी पडद्यावर त्यांच्या खास अभिनय शैलीसाठी ते ओळखले जात.त्यांच्या निधनानंतर देशभरात आणि चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी ग्लॅमर विश्वात प्रवेश करताच त्यांची नावं बदलली. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार हेदेखील त्यापैकी एक आहेत. मनोज कुमार यांचं खरं नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असं आहे. इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव मनोज कुमार असं बदललं. अनेक देशभक्तीपर चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर ते ‘भारत कुमार’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी एबटाबादमध्ये झाला, जो फाळणीनंतर पाकिस्तानचा हिस्सा बनला. मनोज कुमार यांच्या आईवडिलांनी तेव्हा भारताची निवड केली आणि दिल्लीला राहायला आले. मनोज कुमार यांनी फाळणीचं दु:ख स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. ते अशोक कुमार, दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांचे खूप मोठे चाहते होते. त्यांचा प्रत्येक चित्रपट पाहायला त्यांना खूप आवडायचं. त्यांच्या चित्रपटांनी प्रभावित होऊन त्यांनी स्वत:चं नाव बदलून मनोज कुमार असं ठेवलं होतं.

मनोज कुमार हे कॉलेजमध्ये असतानाच थिएटरशी जोडले गेले होते. अखेर एकेदिवशी त्यांनी दिल्लीहून मुंबईला यायचं ठरवलं होतं. मनोज कुमार यांनी अभिनयातील करिअरची सुरुवात १९५७ मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून केली. त्यानंतर त्यांचा ‘कांच की गुडिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ते मुख्य अभिनेते होते आणि बॉक्स ऑफिसवर तो यशस्वी ठरला होता. मनोज कुमार यांनी ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘रोटी कपड़ा और मकान’, ‘संन्यासी’ आणि ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय. बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांचं नाव ‘भारत कुमार’ असंच असायचं. याच कारणामुळे ते चाहत्यांमध्ये ‘भारत कुमार’ म्हणून लोकप्रिय झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा