कर्ली नदीवरील ९५ किमी पट्ट्यातील गाळ काढणार – आम. निलेश राणे
कुडाळातील नद्याच्या गाळ उपसा मोहिमेचा शुभारंभ
कुडाळ :
नद्यांमधील गाळ हा कोकणासाठी फार संकटाचा विषय झाला आहे. त्यामुळे कुडाळ-मालवण मतदारसंघात कर्ली नदीवरील जे क्रिटिकल स्पॉट आहेत, तिथला गाळ काढला जाणार आहे. त्यासाठी “नाम” फाउंडेशन पुढे आले आहे. स्थानिक प्रशासन आणि “नाम” यांच्यात करार झाला आहे. या दोघांनीही हा गाळ काढण्याचे काम हाती घेतले असून हे काम रॉयल्टी फ्री आहे. एवढेच नाही तर १० ठिकाणी नदीतील गाळ काढण्याचे काम लवकरच सुरू होईल. पण त्याही पेक्षा ९५ किमी पट्ट्यातही गाळ काढण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्याचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल. केंद्र सरकारकडूनही यासाठी मदत घेतली जाईल, अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली.
जलसंपदा व मृद जलसंधारण विभाग आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ तालुक्यात नद्यामधील गाळ काढणे कामाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते आंबेडकर नगर कुडाळ येथे झाला. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. कुडाळ तालुक्यात पावसाच्या काळात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गाळ उपसा मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ कुडाळ आंबेडकरनगर येथे करण्यात आला. पावसाळ्यात नदी नाल्याना पूर येऊन त्याचे पाणी वस्तीमध्ये शिरते. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो यावर मात करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाळ उपसा मोहीम सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील नद्याच्या गाळ उपसा मोहिमेला सुरवात करण्यात आली.
यावेळी आमदार निलेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर, संजय पडते, काका कुडाळकर, विलास कुडाळकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार वीरसिंग वसावे, नगर पंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गो. ह. श्रीमंगले, जिल्हा जलसंधारण अधिकारी ध. श्री. साहूत्रे, नाम फाउंडेशनचे गणेश थोरात, यांच्या सह अनेकजण उपस्थित होते.