You are currently viewing काकल्याचे तर्कट : ७

काकल्याचे तर्कट : ७

*ज्येष्ठ साहित्यिक मालवणी भाषाप्रेमी “भोवतालकार” विनय सौदागर लिखित अप्रतिम लेख*

 

काकल्याचे तर्कट:७

 

*परंपरेचो पाईक* 

 

काल पाडवा होता. दुपारच्या वेळी काकल्या माझ्या घरी आला. मला म्हणाला,”तुया गुढयेक जुनो मानगोच वाफरलय. मी म्हटलं,”हो, गेली पंधरा वर्षे मी एकच बांबू वापरतो. गुढी झाली की घराच्या बारावर ठेवून देतो.”

“ह्या मात्र तू बरा केलंस, नायतर सगळेजण दरवर्सा गुढयेसाठी नयो मानगो तोडतत. गावात पाचशे घरा हत, म्हंजे काल पाचशे मानगे तोडल्यानी आसतले. बरा, परत्येकाच्या पोरसात मानगो नसता; मगे येक तर इकत, नायतर मागून, नायतर चोरून मानगो हाडतत आणि हेका ते परंपरा म्हणतत.” काकल्याने व्याख्यान सुरू केले. त्याला थांबवत मी म्हणालो,”मग मी करतो ते बरोबर ना?”

“होयच, पून ह्या दुसऱ्यांका पून सांगूक होया.”

मी म्हणालो,”मला हे जमणार नाही. तुझ्या नादाला लागून मागे मी होळी बद्दल लोकाना सांगायला गेलो, तर लोक माझ्या अंगावर आले. ते म्हणतात, आमची परंपरा बदलणारा तू कोण?” खरंच परंपरा म्हणजे काय हेच नीट समजत नाही. मला म्हणाले,’ते लोक इदीक बकरे कापतत, ख्रिसमस ट्री उभी करतत, तेच्यावरती बोला मरे.”

हे ऐकून काकल्या म्हणाला,”तू त्येंका उत्तर दिवचा, आपल्या धर्मात चुकीचे गोष्टी असतत, ते आपण सुधरूचे. आपला घर सुधारूचा असता, दुसऱ्याचा न्हय.धर्म जागृती हुंजे दुसऱ्या धर्माच्या आंगार जाणा न्हय.लोक जेवा म्हंतत की, त्येंच्या सणात रक्ताचे पाट व्हावतत, तेवा ते इसारतत की गटारेक आणि धुळवडीक कसले पाट व्हावतत. तशे शिरोड्याच्या बाजारात रोजच माशे ,चिकन चालू. तेच्यात्सून काय अमृत व्हावता? आणि खातत कोण? सगळेच मां? आपल्या धर्मातला चूकीचा आपण सुधरूचा. तेंच्या धर्मात पण बरे लोक आसतले, ते ता सुधारतीत. नवीन वरास आनंदात साजरा करणा इतक्याच खरा. बाकी धरम, परंपरेत खूप गोंधळ आसता.” थोडावेळ थांबून काकल्या परत बोलू लागला,”बरा, तूझ्या झिलाक मराठी म्हयने पाठ आसत मां? पंचांग कळता मां? नाय हयतो परंपरेचो पाईक स्वागत यात्रेक सदरो घालून फुडे आसता हूनान इचारलय.” अपेक्षित टोला हाणून काकल्या चालू पडला. आमचे चिरंजीव हे ऐकत होते, त्यामुळे पाडव्या नंतरही आमच्या घरात शिमगा सुरू होता.

 

*विनय सौदागर*

आजगाव, सावंतवाडी

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा