मळगाव घाटीत कार दरीत कोसळली; चौघेजण जखमी
गांधील माशांचा हल्ला तरीही बचावकार्य सुरू; ग्रामस्थ व प्रवाशांचे धाडसी सहकार्य
सावंतवाडी
मळगाव घाटीमध्ये इको कार थेट दरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला असून या अपघातात चौघेजण जखमी झाले आहेत. ही घटना आज सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास डिके टुरिझम हॉल परिसरात घडली.
अपघातात संबंधित वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुटुंब हे लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना हा अपघात घडला. जखमी व्यक्ती या सावंतवाडीतील सालईवाडा येथील शिरसाट कुटुंबीय असल्याचे समजते.
दरम्यान, गाडी दरीत कोसळल्यानंतर त्या परिसरात गांधील माशांनी हल्ला केल्याने बचावकार्य करताना अडचणी निर्माण झाल्या. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही सामाजिक बांधिलकी जपत रवी जाधव व इतर प्रवासी तसेच ग्रामस्थांनी धाडसाने जखमींना बाहेर काढले.
जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बचावकार्यामध्ये रवी जाधव, मायकल डिसोजा, विशाल बांदेकर, राजू, राहुल, मनोज नार्वेकर, नारायण चव्हाण, बाळा नार्वेकर, शुभम कळसुलकर, सुधीर जडिये, राकेश मसुरकर आणि अजित जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.
