देवसू विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी शैक्षणिकदृष्ट्या घेतली गगनभरारी….
सावंतवाडी :
तालुक्यातील देवसू माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीतील कुमारी श्वेता रामकृष्ण देऊसकर या विद्यार्थिनीने महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा महामंडळाची “नॅशनल मेन्स मेरिट स्कॉलरशिप” पटकावली असून तिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर कुमारी दिव्या भगवान वरक या इयत्ता आठवीतील विद्यार्थिनीने नवोदय विद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण झाली असून पुढील शिक्षणासाठी ते नवोदय विद्यालयात प्रवेश घेणार आहे.
देवसू माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक राजाराम पाटील, सहाय्यक शिक्षिका सोनाली परब, मीना डोंगरे, सिद्धराम राठोड यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचा व पालकांचा ओढा हा शहरी भागातील शाळांमध्ये शिक्षण घेण्याचा असतो मात्र देवसू ओवळीये, पारपोली यांसारख्या ग्रामीण भागातील या माध्यमिक विद्यालयात शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी असून देखील शिक्षकांचा शिक्षणाप्रती असलेला आदर व शिकवण्याची मानसिकता यातूनच विद्यार्थी हे यश मिळवत असतात.
शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना भौतिक सुविधांपेक्षा शैक्षणिक सुविधा व शिक्षकांचे मार्गदर्शन कशाप्रकारे लाभते?, यावरच तो विद्यार्थी भविष्यात आपल्या जीवनात विविध क्षेत्रात यश मिळवत असतो. देवसू, ओवळीये व पारपोली या तीन गावातील अनेक विद्यार्थ्यांना या विद्यालयाने घडवले असून आज अनेक विद्यार्थी आपल्या पुढील जीवनात विविध क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करत आहेत. विद्यार्थिनींच्या यशाबद्दल गांगोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. लवू सावंत, उपाध्यक्ष प्रमोद परब ,सचिव मोहन गवस, संचालक सागर सावंत, विठ्ठल सावंत, अविनाश सावंत, राजेश परब, अरुण परब, तसेच पारपोली, ओवळीये, व देवसू गावातील ग्रामस्थांनी माध्यमिक विद्यालय देवसूचे सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.