You are currently viewing राजकोट येथील बंधारा कामाची आमदार निलेश राणे यांनी केली पाहणी

राजकोट येथील बंधारा कामाची आमदार निलेश राणे यांनी केली पाहणी

अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना

मालवण :

राजकोट येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम योग्य दर्जाचे होत नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने आज संबंधित अधिकाऱ्यांना घेत पाहणी करत त्यात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत संबंधित विभागाकडून योग्य ती कार्यवाही करून घेतली जाईल असे आमदार निलेश राणे यांनी आज येथे स्पष्ट केले.राजकोट येथे नव्याने धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू आहे. मात्र या बंधाऱ्याचे काम योग्य दर्जाचे होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आज आमदार निलेश राणे यांनी राजकोट येथे भेट देत बंधाऱ्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, जिल्हा प्रमुख संजू परब, जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, दीपक पाटकर, सुदेश आचरेकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, राजू बिडये, भाऊ मोर्जे, संदीप भोजने युवती जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, युवा जिल्हा प्रमुख ऋतिक सामंत, श्री. खांदारे, सतीश आचरेकर, जॉन नरोना, अंजना सामंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राजकोट बंधाऱ्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी आपले प्रयत्न आहेत. त्यामुळे स्थानिकांच्या या बंधाऱ्याच्या दुरुस्ती बाबत जे काही म्हणणे होते त्याची माहिती घेऊन सर्व स्थानिकांना विश्वासात घेत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्याबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या असून त्याच्याकडून माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे असे आमदार श्री. राणे यांनी स्पष्ट केले.तालुक्यातील किनारपट्टी भागात जी काही बंधाऱ्यांची कामे झाली ती नारायण राणे यांच्या काळात झालेली आहेत. त्यानंतर या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी किंवा नव्याने देवबाग, तळाशील येथील बंधारा उभारणीच्या कामाला आवश्यक निधी मिळालेला नाही. मात्र आता महायुतीच्या सरकारच्या काळात आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. पालकमंत्री मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेण्यात यशस्वी ठरत आहेत. आम्हीही आवश्यक हातभार लावत आहोत. जेवढा काही निधी आवश्यक आहे तो येथे वळवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. बजेटमध्येही देवबाग या गावासाठी १५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. हा निधी तर उपलब्ध होणारच आहे. शिवाय संबंधित विभागाचा तसेच जिल्हा नियोजन मधूनही निधी उपलब्ध होणार आहे. निवडणुकीपूर्वी निधी उपलब्ध करून देण्याचे जे आश्वासन दिले होते. त्यानुसार गेल्या दोन महिन्यात आवश्यक निधी विकास कामांसाठी उपलब्ध करून दिला गेला आहे. गेल्या दहा वर्षात कुडाळ मालवण मतदार संघाला काहीही मिळाले नाही. मोठ्या प्रमाणात जो बॅकलॉग आहे तो आम्ही लवकरात लवकर भरून काढण्याचे काम करू असेही श्री. राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.या बंधाऱ्याचे काम नेमके कोण करत आहे. शिवाय या बंधाऱ्याच्या कामात कोणत्या बाबींचा समावेश आहे याची माहिती सर्वांना समजावी यासाठी ठेकेदाराने याठिकाणी माहितीचा फलक लावण्याची कार्यवाही तत्काळ करावी असे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा