*मनस्पर्शी साहित्य व कला क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम अभंग रचना*
*श्री स्वामी समर्थ…*
योगियांचा राजा | तू रे योगिराज |
स्वामी महाराज | श्री समर्था ||
तुझा रे निवास | वटवृक्षाखाली |
धरी तू सावली | भक्तांवरी ||
भिऊ तू नकोस | आहे मी पाठीशी |
हेची तू सांगशी | साऱ्या भक्ता ||
किरण दाविशी | सदा रे आशेचा |
आधार शब्दांचा | तुझ्या वाटे ||
आमुची तू माता | आमुचा तू पिता |
आमुचा तू त्राता | सर्वकाळ ||
असू दे कृपेचा | हात रे मस्तकी |
नको काही बाकी |मला देवा ||
श्री स्वामी समर्थ | साऱ्या रे जगाचा |
शुद्ध करी वाचा | माझी देवा ||
म्हणेन आरती | गाईन अभंग |
नामात रे दंग | राहीन मी ||
उचलू पालखी | धरू खांद्यावरी |
दत्त अवतारी | समर्थाची ||
कोणत्या रुपात | येशील धावून |
हेची सांगे मन | वेळोवेळी ||
आली रे प्रचिती | सदा तू राहशी |
आमच्या पाठीशी | श्री समर्था ||
@अरुणा गर्जे
नांदेड