जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यालयांना सरप्राइज भेटी देण्याचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे धोरण कौतुकास्पद – प्रसाद गावडे
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मागील दोन वर्षांचा आढावा घेता प्रशासक राजवटीत दैनंदिन लेट लतिफ व कामास आळशी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ झालेली दिसून येते. याची गंभीर दखल घेत नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रवींद्र खेबूडकर यांनी पदभार स्वीकारताच कर्मचाऱ्यांना सेवा शिस्तीचे डोस पाजण्यास सुरुवात केलेली असून ते कार्यालयांमध्ये सकाळी 9.45 वाजता सरप्राईज भेटी देत कर्मचाऱ्यांची हजेरी मस्टर तपासणी करत आहेत. याशिवाय कार्यालयीन अभिलेख मांडणीत सुसूत्रता आहे की कसे याबाबत कपात उघडून स्वतः पडताळणी करत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे हे धोरण अतिशय कौतुकास्पद असून कर्मचाऱ्यांनी मात्र ह्याचा धसका घेतल्याची चर्चा संपूर्ण जिल्हापरिषदेत रंगू लागली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना ते लोकसेवक असल्याची जाणीव करून देत कार्यालयीन वेळ पाळण्याची शिस्त व शासकीय अभिलेख जपण्यात सुसूत्रता ठेवण्याचा आग्रह स्वागतार्ह असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील पंचायत समिती कार्यालये व ठराविक ग्रामपंचायत कार्यलयांना सरप्राइज भेटी देऊन दफ्तर तपासणी करावी अशी सिंधुदुर्ग वासियांची इच्छा आग्रही मागणी असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी दिली.