You are currently viewing यशदाचे मानक संचालक रंगनाथ नाईकडे 

यशदाचे मानक संचालक रंगनाथ नाईकडे 

 

दरवर्षीप्रमाणे आमचे अमरावती जिल्ह्यातील नागपूर हायवे वरील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरी ह्या आश्रमातील भव्य सभागृह येथे डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीतर्फे स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर सुरु होते. तेव्हा मा.श्री. शिवाजीराव मोघे सामाजिक न्याय मंत्री होते. त्यांचे सचिव श्री रंगनाथ नाईकडे भारतीय वन सेवा हे माझे मित्र होते.श्री. रंगनाथ नाईकडे म्हणजे स्पर्धा परीक्षेला शंभर टक्के वाहिलेले व्यक्तिमत्व .मी त्यांना निमंत्रण दिले होते .त्यांचा मला फोन आला काठोळे मी शिबिराला येत आहे. ते अमरावतीला पोहोचले. शासकीय कामे आटोपून त्यांनी मला फोन केला. काठोळे मी निघालो आहे .अमरावती ते मोझरी हे साधारणपणे पंचवीस मिनिटांचे अंतर आहे. आम्ही गुरुकुंज मोझरीच्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या गुरुकुंज आश्रमाच्या महाद्वारावर नाईकडे साहेबांच्या लाल दिव्याच्या गाडीची वाट पाहत होतो. झाले वेगळेच. आमच्यासमोर एक नँनो येऊन थांबली. गाडी बाहेरून पूर्ण रंगवलेली होती .कुठल्यातरी ड्रायव्हिंग स्कूलची गाडी होती. त्या ड्रायव्हिंग स्कूलची जाहिरात गाडीवर सर्वत्र लावलेली होती. दार उघडले गेले आणि त्यातून रंगनाथ नाईकडेसाहेब उतरले. मी त्यांना हात जोडले. म्हटले साहेब तुम्ही एवढे मोठे वरिष्ठ अधिकारी आणि नँनो मधून आले. ते म्हणाले मोठमोठ्या गाड्यांमधून खूप फिरलो आहे. या नँनोची टेस्टिंग करायची होती .म्हटलं दोन्ही काम होतात. तुमच्या शिबिराला भेट होते आणि या नँनोची आणि ड्रायव्हिंग स्कूलची टेस्टही होते .

आमच्या शिबिरार्थींना तो धक्का होता .एवढा मोठा वरिष्ठ अधिकारी साध्या ड्रायव्हिंग स्कूलच्या नँनोमधून येतो .ही त्याच्या साधेपणाची ओळख होती .रंगनाथ नाईकडेसाहेब संपूर्ण नागपूर वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक म्हणून कार्यरत होते. पण ते एवढ्या मोठ्या पदावर असले तरी स्पर्धा परीक्षेच्या जगतात महाराष्ट्रात पहिल्या दहामध्ये त्यांचे नाव आहे.गेल्या अनेक वर्षापासून हा माणूस स्पर्धा परीक्षेसाठी सावंतवाडी पासून तर गडचिरोली पर्यंत सतत फिरत राहिलेला आहे .

.मला आठवते आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जवळील खामगावला स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन ठेवले होते. रंगनाथ नाईकडे अध्यक्ष होते .नियमानुसार अध्यक्ष केव्हा येणार कसे येणार काय व्यवस्था करायची यासाठी मी त्यांना फोन केला. ते म्हणाले माझी काही काळजी करू नका. मी बरोबर पोहोचतो. कार्यक्रमाच्या एक तास आधी मी खामगावला पोहोचलेला असेल. तेव्हा साहेबांचे पोस्टिंग कोल्हापूरला होते. एवढ्या मोठ्या पदावर असलेला हा माणूस खामगावच्या विदर्भ स्पर्धा परीक्षा संमेलनाला बरोबर वेळेवर पोहोचला .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संपूर्ण विदर्भातून स्पर्धा परिषदेला आलेल्या विद्यार्थ्यांना भेटला. फोटो काढले आणि रंगुनि रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ही छबी उमटवून गेला.

रंगनाथ नाईकडे सरांचे नाव मी खूप वर्षांपूर्वी ऐकले होते. एक वेळा डॉ.बबन बेलसरेंकडे बसलो होतो. त्यांचे नातेवाईक श्री केशव दहिकर यांनी मला स्पर्धा परीक्षेसाठी दोन लोकांचे नावे सुचवली. त्यातले एक रंगनाथ नाईकडे सरांचे होते. त्यादिवसापासून रंगनाथ नाईकडे सरांचे माझे समीकरण जुळले .अतिशय साधा राहणारा सर्व सामान्य माणसाचे प्रश्न समजून घेणारा आपुलकीने बोलणारा आणि प्रसंगी जमिनीवर बसणारा असा हा माणूस महाराष्ट्राच्या वन विभागाच्या प्रादेशिक वनसंरक्षक या नागपूरच्या सर्वोच्च पदावर विराजमान होता ते खरोखरच आमच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जमेची बाजू आहे. तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही हा माणूस दोन-दोन तीन-तीन महिने घरी जात नाही. सगळे शनिवार-रविवार स्पर्धा परीक्षा कार्यशाळा भजन-कीर्तन यासाठी बुक असतात. मला त्यांचे नेहमी सांगणे असते काठोळे तुम्ही कुठेही जा तुमच्या राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था माझ्यातर्फे, पण मी अजून त्यांना ती संधी दिलेली नाही.

परवा त्यांना मुख्य वनसंरक्षक झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या .साहेबांना रुजू होऊन दोन-तीन दिवसाचा कालावधी झाला होता .साहेबांनी मला कार्यालयात येण्याचे निमंत्रण दिले .साहेब जरी वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी असले तरी त्यांना छंद आहे तो स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हितगुज करण्याचा व कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा. मागे ते अमरावतीला आले. मी बाहेरगावी होतो .मला म्हणाले मी अमरावतीला येत आहे .विद्यार्थ्यांशी बोलणार आहे. नाईकडे साहेबांची ही विनंती मी मान्य केली. मी गावात नव्हतो तरी माझे सहकारी श्री स्वप्नील आळेकर हे त्यांच्या संपर्कात होते .त्यांनी साहेबांचा व विद्यार्थ्यांचा सुसंवाद घडवून आणला .कार्यक्रम संपल्यानंतर नाईकडे साहेब म्हणाले .तुमची टीम चांगली आहे. तुम्ही नसतानाही चांगलं नियोजन झालं.

मागची मला एक गोष्ट आठवते .माझं एक काम मंत्रालयातील अडलेले होतो. साहेब तेव्हा कोल्हापूरला होते. मी त्यांना कामाचे स्वरूप सांगितले. काही काळजी नका करू .सोमवारला मंत्रालयात या.मी कोल्हापूरवरून येतो .तुम्ही अमरावतीवरून या. आमची भेट झाली. मला संबंधित मंत्र्याकडे घेऊन गेले .मंत्री अँटी चेंबरमध्ये जेवण करीत आहेत असे त्यांच्या सचिवांनी सांगितले .साहेब मला म्हणाले .काठोळे चला आत. मी म्हटलं मंत्रीमहोदय जेवण करीत आहेत ना ? साहेब म्हणाले आपले एक मिनिटाचे तर काम आहे. मंत्री खरोखरच जेवण करीत होते.मंत्री कॅबिनेट दर्जाचे होते. नाईकडे साहेबांनी माझा परिचय करून दिला. योगायोगाने त्यांनी मला ओळखले होते. स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त नागपूरच्या वसंतराव देशपांडे हॉलमध्ये दैनिक लोकमतने माझा मी आय ए एस अधिकारी होणारच हा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता .त्या कार्यक्रमाला ते पूर्णवेळ उपस्थित होते .मंत्री महोदय म्हणाले मी काठोळेंना ओळखतो .नाईकडे साहेब म्हणाले सर फक्त तुमची सही पाहिजे होती.मंत्रीमहोदयांनी जेवण थांबवले आणि लगेच सही करून दिली .मी पाहतच राहिलो .एका अधिकाऱ्याचा व मंत्री महोदयांचा चांगुलपणा त्यादिवशी पाहायला मिळाला. कॅबिनेट मंत्री महोदय जेवण थांबवून सही करतात .यामध्ये त्या अधिकाऱ्याचा मोठेपणा दिसून आला .

मागे शेगावला कीर्तन महोत्सव होता .त्या कार्यक्रमांमध्ये माझ्या मी आयएएस अधिकारी होणारच. शेतकऱ्यांची मुले झाली कलेक्टर. या पुस्तकांचे प्रकाशन माननीय नाईकडे साहेबांकडे हस्ते झाले. परवा कोल्हापूरला गेलो .साहेबांनी लगेच माझा कार्यक्रम आयोजित केला .घरी बंगल्यावर जेवण करायला घेऊन गेले आणि कोल्हापूरची आठवण म्हणून मला एक भेटवस्तू दिली . साहेब पुण्याला असतांना माझी गाडी त्यांच्या घरा समोरून जात होती. त्यांच्या नावाची पाटी दिसली .मी पटकन गाडी आत मध्ये घेतली. साहेब घरी नव्हते .वहिनी साहेबांनी स्वागत केले. साहेबांना फोन लावला .साहेबांनी वहिनी साहेबांना सांगितले .काठोळे साहेब आपले जवळचे मित्र आहेत. त्यांना जेवण करूनच पाठवा आणि मला म्हणाले मी तुमच्यासाठी शासकीय विश्राम भवनातील एक कक्ष आरक्षित करीत आहे. तुम्ही विश्राम भवनात थांबा .मी सरांना सांगितले सर मी मित्राकडे थांबणार आहे .केवढा हा जिव्हाळा .त्यांचे खाते वेगळे. माझे खाते वेगळे. पण हे सगळे असताना स्पर्धा परीक्षा मात्र आमचा दोघांचा एक कॉमन छंद आहे. एक वरिष्ठ अधिकारी स्पर्धा परीक्षांसाठी काय करू शकतो यावर स्वतंत्र ग्रंथ लिहिण्यासारखं आहे .त्यांनी लिहिलेले स्पर्धा परीक्षेचे अनुभव व व्याख्याने याची गोळाबेरीज केली तर एक पीएचडीचा प्रबंध होऊ शकेल .स्टडी सर्कलचे आनंद पाटील हे त्यांचे जवळचे मित्र .आनंद पाटलाच्या स्पर्धा परीक्षा संमेलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. पुण्याचे साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड व साहेब वर्गमित्र .या दोघांचीही मैत्री नोंद करण्यासारखी आहे.तळागाळ्यातील गाळ्यातील माणसांची दखल घेणारा त्यांना आपुलकीने बोलणारा त्यांच्या समस्या समजून घेणारा असा हा माणूस. अशी माणसं प्रशासनात लागली तर बरंच काही चांगलं होऊ शकते. साहेब आज आपण महाराष्ट्रातील पुणे येथे मानस संचालक या पदावर कार्यरत आहे. प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक हे पद त्यांनी भूषविले आहे.खरोखरच आपल्याला खऱ्या अर्थाने शासनाने आपल्या कार्याचा गौरव करून ही मोठी जबाबदारी दिली आहे आणि या जबाबदारीत आपण दिवसेंदिवस प्रगती करावी यासाठी आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

 

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक

डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती

98 90 96 70 03

प्रतिक्रिया व्यक्त करा