आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आ. वैभव नाईक यांची मागणी.
कुडाळ / पूनम राटूळ :-
कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या उर्वरित कामासाठी १ कोटीच्या निधीस आरोग्य विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून लवकरात लवकर या निधीची तरतूद करून तो वर्ग करण्यात यावा अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन केली आहे. त्यावर राजेश टोपे यांनी तात्काळ सकारात्मक कार्यवाही करून निधी वितरीत करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत.
खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे कुडाळ येथील १०० खाटांच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या उर्वरित कामासाठी १ कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी १ कोटी निधीची तात्काळ तरतूद करून तो वर्ग करण्यात यावा यासाठी आ. वैभव नाईक यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन मागणी केली.
त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या शासकीय मेडिकल कॉलेजची उभारणी तातडीने होणे आवश्यक आहे त्यादृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी आ. वैभव नाईक यांनी केली. त्यावर राजेश टोपे यांनी लवकरच याबाबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे मान्य केले आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या कामाबाबत चर्चा झाली यावेळी ना.राजेश टोपे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे सांगत आ. वैभव नाईक यांच्याशी बोलताना जिल्हा रुग्णालयाच्या कामाचे कौतुक त्यांनी केले आहे.