You are currently viewing स्व.रवींद्र जाधव : तो राजहंस एक 

स्व.रवींद्र जाधव : तो राजहंस एक 

तत्कालीन महामहीम राष्ट्रपतींचे स्वीय सहाय्यक स्व.मा.श्री रवींद्र जाधव यांच्या नावाने ग्लोबल फाउंडेशन तयार झाले असून त्याचे उद्घाटन येत्या शनिवार दि. 29 मार्च रोजी दुपारी चार वाजता पुणे येथे बाणेर परिसरातील बीबीसी टॉवरमध्ये होत आहे त्यानिमित्त

 

स्व.रवींद्र जाधव : तो राजहंस एक 

 

महामहीम राष्ट्रपती यांचे स्वीय सहाय्यक होणे म्हणजे फार मोठी गोष्ट. त्या ठिकाणी नेमणूक होण्यासाठी तुमच्या ठिकाणी तेवढी मोठी पात्रता लागते. हे योग्यता असणारे आमचे जिवलग मित्र अमरावतीचे माजी जिल्हाधिकारी नाशिकचे माजी विभागीय आयुक्त श्री रवींद्र जाधव हे महामहिम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून जेव्हा निवडल्या गेले तेव्हा सर्वांनी एका सर्वोत्कृष्ट आयएएस अधिकाऱ्याची योग्य ठिकाणी निवड झाल्याचा आनंद व्यक्त केला.

आज रवींद्र जाधव साहेब आमच्यात नाहीत. पण एक सनदी अधिकारी म्हणून त्यांनी केलेले कार्य आम्ही तसेच ते ज्या ज्या ठिकाणी अधिकारी म्हणून कार्यरत होते ते लोक कधीही विसरणार नाहीत. खरं म्हणजे सनदी अधिकारी म्हणजे तारेवरची कसरतच. शासन आणि जनता यांचा समन्वय साधून त्या त्या विभागाचा प्रमाणिक विकास करणे हे कौशल्य स्व.

रवींद्र जाधव साहेबांनी आत्मसात केले होते .म्हणून रहे ना रहे हम महका करेंगे या नात्याने त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी दिनांक 29 मार्च रोजी दुपारी चार वाजता बाणेर परिसरातील बीबीसी टॉवरमध्ये रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशनची निर्मिती होत आहे. आम्ही पुढे चालू आपला वारसा हे ब्रीदवाक्य ठेवून हा अभिनव उपक्रम या दिवशी प्रारंभ होणार आहे

 

माझे श्री रवींद्र जाधव साहेबांशी कौटुंबिक ऋणानुबंध होते. एक सनदी अधिकारी म्हणून नव्हे तर एक चांगला मित्र म्हणून मी त्यांच्या यादीत होतो. आम्ही जवळ येण्याचे दुसरे एक कारण होते ते हे की माझे व्याही श्री प्रदीप वानखडे व जाधव साहेब हे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे असलेल्या शासकीय विद्यानिकेतनचे विद्यार्थी होते. माझ्याशीच नव्हे तर सर्वांशीच जाधवसाहेब कधीही सनदी अधिकारी म्हणून वागले नाहीत .तर एक प्रसन्न चेहऱ्याचा माणुसकीचा परोपकाराची भाव असलेला माणूस म्हणूनच ते प्रत्येक वेळी वागत गेले आणि म्हणूनच ते जनमानसाच्या हृदयात जाऊन बसले. अधिकारी येतात आणि जातात .पण जाधव साहेबांच्या बाबतीत अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती असेच म्हणावे लागेल. ते ज्या ज्या शहरात राहिले त्या त्या शहरात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवून गेले.

महामहीम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांची जेव्हा राष्ट्रपतीपदावर नियुक्ती झाली तेव्हा त्यांनी या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला आपले स्वीय सहाय्यक म्हणून दिल्लीला बोलावून घेतले. या माणसाने खऱ्या अर्थाने राष्ट्रपती भवन हे लोकाभिमुख करून टाकले. त्यांच्या काळात राष्ट्रपती भवनामध्ये जेवढे लोक घेऊन गेले असतील त्या सर्वांनी जाधव साहेबांना समाधानाची पावती दिली.

 

आमच्या सौभाग्यवती सौ विद्या काठोळे ह्या अमरावती येथील तपोवन ह्या कुष्ठधामात महामना मालवीय विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्या शाळेची सहल घेऊन राष्ट्रपती भवनात गेल्या. सोबत माझे जावई श्री सारंग वानखडे व कन्या डॉ. प्राची पण होत्या.आपण खूप पुढे गेलो असलो तरी कुष्ठरोग म्हटल्यानंतर घाबरतोच. पण श्री रवींद्र जाधव साहेबांनी या सर्व विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींची भेट घालून दिली .त्यांच्याबरोबर फोटो काढले आणि सर्वात महत्त्वाचे गेलेल्या पन्नासही विद्यार्थ्यांना त्यांनी राष्ट्रपती भवनात जेवण दिले. जिथे आजही समाज कुष्ठरोग यांना जवळ करत नाही त्या कुष्ठधामातील विद्यार्थ्यांना जेवण देऊन राष्ट्रपतींची भेट करून देऊन तसेच त्यांच्याबरोबर फोटो काढून देऊन माननीय श्री रवींद्र जाधव यांनी आपल्या ठिकाणी असलेल्या माणुसकीचे दर्शनच घडवून दिले आहे.

 

ते महाराष्ट्रात वेगवेगळ्या पदावर कार्यरत होते. आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला. त्यांचा प्रशासकीय कार्यकाळही नमूद करण्यासारखाच आहे. पण त्या व्यतिरिक्त त्यांनी जनमानसावर स्वतःच्या माणुसकीची जी छाप पडली आहे त्यामुळे जाधव साहेब आज आमच्या जरी नसले तरी त्यांच्या मानवतेमुळे आजही ते आमच्यातच आहेत.

एक वेळची गोष्ट आहे. साहेब अमरावती जिल्ह्यातून परतवाडा धारणी या दुर्गम भागातून अमरावतीकडे कारने येत होते .पाऊस सुरू झाला होता. त्यांच्या गाडीसमोर एक पती-पत्नी मोटरसायकलवर जात होते. साहेब लक्ष देऊन होते. अंधार पडलेला होता. साहेबांनी मुद्दामच समोरच्या मोटर सायकलवाल्यांना त्रास होऊ नये म्हणून चालकाला गाडी हळू घेण्यास सांगितले. पुढे गेल्यानंतर साहेबांच्या लक्षात आले की मोटर सायकल दिसत नाही. साहेबांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. साहेब स्वतः उतरले आणि मागचा पुढचा रस्ता त्यांनी पिंजून काढला. पावसामुळे त्या जोडप्याची मोटरसायकल स्लीप होऊन ते दोघेही आजूबाजूच्या झुळपात पडले होते. साहेबांनी व इतर गाडीतील इतरांनी त्यांना उचलले .साहेबांच्या गाडीत टाकले आणि गाडी सरळ रुग्णालयात नेली. एक जिल्हाधिकारी माणूस लोकांच्या किती जवळचा असू शकतो .लोकांची किती काळजी घेतो. त्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे

 

आम्ही काही मित्रमंडळी एक वेळ दिललीला गेलो. श्री रवींद्र जाधव साहेब राष्ट्रपती भवनात असल्यामुळे माझे भवन पाहून झाले होते. माझ्याबरोबर असलेल्या मित्रांनी ते पाहिले नव्हते. त्यांनी माझ्याजवळ ती इच्छा बोलून दाखवली. मी लगेच श्री रवींद्र जाधव साहेबांना फोन लावला. खरं म्हणजे राष्ट्रपती भवन पाहायचे तर त्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागते. पण श्री रवींद्र जाधव साहेब असल्यामुळे आणि त्यांना माझा स्वभाव माहीत असल्यामुळे त्यांनी लगेच परवानगी दिली .आम्ही राष्ट्रपती भावनात गेलो. ठीक ठिकाणी असलेल्या तपासणीतूनच आम्ही आत मध्ये गेलो

. सरांनी सर्व ठिकाणी सूचना देऊन ठेवलेल्या होत्या. त्यामुळे आम्हाला काहीच अडचण आली नाही.

 

 

 

महामहीम राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील अमरावतीला येणार होत्या .माझी काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर होती. महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते या पुस्तकांचे लोकार्पण झाले तर किती चांगले होईल हा विचार माझ्या डोक्यात आला .मी जाधव साहेबांना तो बोलून दाखवला. जाधव साहेबांनी मला रितसर् विनंती अर्ज करण्यास सांगितला .त्याप्रमाणे मी तो केला. सोबत आमच्या मिशनचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब हिवसे आणि आमच्या मित्रमंडळींना देखील यायचे असल्यामुळे त्यांचीही नाव त्या अर्जात टाकली. जाधव साहेबांनी तत्पर पावले उचलली. अमरावतीच्या राष्ट्रपतीच्या दौऱ्यात आमच्या पुस्तकांचा लोकार्पण सोहळा साहेबांमुळे शक्य झाला. एका लेखकाचा राष्ट्रपतींच्या हस्ते हा झालेला सन्मान केवळ श्री रवींद्र जाधव साहेबांमुळेच झाला .माझ्या जीवनात हा प्रसंग मी कधीही विसरणार नाही.

 

 

श्री रवींद्र जाधव साहेब अमरावती जिल्हाधिकारी पदावरून राष्ट्रपती भवनात जाणार होते. नवीन जिल्हाधिकारी डॉक्टर पुरुषोत्तम भापकर हे अमरावतीला आलेले होते. मी रवींद्र जाधव साहेबांना भेटावयास जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. तेव्हा नुकतेच डॉक्टर पुरुषोत्तम भापकर आलेले होते. चार्ज देण्याची प्रक्रिया सुरू होती. रवींद्र जाधव साहेबांनी माझा नवीन जिल्हाधिकाऱ्यांशी परिचय करून दिला आणि सांगितले हा माणूस लष्कराच्या भाकरी भाजणारा आहे .या माणसाने घरादारावर पाणी सोडलेले आहे .तुळशीपत्र ठेवलेले आहे. यांना सहकार्य करावे. अगदी दोन ओळी मध्ये त्यांनी माझा खरा परिचय करून दिला होता. चार्ज देणे व घेणे ही खरं तर शासकीय बाब होती. एक प्रक्रिया होती. पण त्या शासकीय कामकाजातही त्यांनी मला सहभागी करून घेतले. माझा तो मी सन्मान समजतो.

 

मी स्पर्धा परीक्षाला जे विद्यार्थी बसतात त्यांना विनामूल्य मार्गदर्शन करतो. साहेब नाशिकला असतानाची गोष्ट .ते विभागीय आयुक्त होते .मी व सौ विद्या नाशिक जिल्ह्यात सेमिनार घेत होतो .आमचा शेवटचा सेमिनार संपला. त्यावेळेस सायंकाळ झाली होती .मी साहेबांना फोन केला .त्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी मला बोलावले. आमची कार परिसरामध्ये शिरताच साहेब आमचे स्वागत करायला समोर आले. चहापान झाले .तेव्हा सायंकाळचे सात वाजले होते .मी साहेबांचा निरोप घ्यायला लागलो. साहेब मला म्हणाले इतक्या रात्री कुठे जातात .म्हटलं अमरावतीला. साहेबांनी मला व सौ विद्याला आज मुक्काम करून जा असा आग्रह धरला. खरं म्हणजे त्यावेळेस त्यांच्याकडे दिल्लीचे पाहुणे होते .पण साहेबांनी आग्रह करून आम्हाला त्यांच्या बंगल्यातच थांबून घेतले .चांगले आदरतिथ्य केले आणि सकाळी आम्ही अमरावतीच्या दिशेने आमची कार वळवली.

 

राष्ट्रपतींचा स्वीय सहाय्यक असलेला माणूस नाशिकचा विभागीय आयुक्त असलेला अधिकारी किती मानवतेचा आहे याचे मूर्तीमंत उदाहरण त्यांनी आपल्या वर्तनणुकीतून समाजासमोर ठेवले होते. म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतरही ते जनमानसात कायम आहेत.

 

जाधव साहेबांबद्दल लिहिण्यासारखे खूप काही आहे. मी ते त्यांच्या स्मृती ग्रंथात विस्ताराने लिहिलेले आहे. जाधवसाहेबांबरोबरच वहिनी साहेबांचा मला या ठिकाणी कृतज्ञतेने उल्लेख करावा लागेल. साहेबांना त्यांनी खऱ्या अर्थाने समर्थपणे साथ दिली. साहेब अमरावतीला जिल्हाधिकारी असताना आमच्या त्यांच्या बंगल्यावर सतत चकरा सुरू असायच्या.. साहेब नसले तरी वहिनी साहेबांनी कधी स्वागतामध्ये उणीव भासू दिली नाही. साहेबांच्या आईसाहेब देखील साहेबांबरोबरच होत्या. मी त्यांच्याबरोबर बोलत बसायचा. अमरावतीचे जिल्हाधिकारी निवासस्थान हे आम्हाला आपलेसे वाटायचे

 

साहेबांच्या अकाली निधनाने आमच्या सर्व मित्रमंडळींना धक्का बसला. साहेबांच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा मी ड्रायव्हरला कार जळगावच्या दिशेने घ्यायला सांगितली. वाटेत फक्त पेट्रोल भरण्यासाठी गाडी थांबवली. साहेबांचे अंतिम दर्शन व्हावे ही मनोमन इच्छा होती. जळगाव गाठले. साहेबांचे अंतिम दर्शन घेतले. पूर्ण परिसर माणसांनी भरून गेला होता. साहेबांच्या कन्या पुण्यावरून यायच्या होत्या .त्या आल्याबरोबर अंत्ययात्रेला सुरुवात झाली. जड मनाने आम्ही एका सुस्वाभावी परोपकारी माणसाला शेवटचा निरोप दिला..

आज शनिवार दिनांक 29 मार्च 2025 रोजी दुपारी चार वाजता जे फाउंडेशन त्यांच्या नावाने तयार झाले आहे त्यामध्ये सर्वजण सहभागी होणार आहेत .जाधव साहेबांनी आम्हाला जो वारसा दिला तो वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अशी राजहंस माणसे फारच कमी असतात आणि म्हणून अशा माणसांची दखल घेणे त्यांचा वारसा पुढे चालवणे हा हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे.

 

 

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा