*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हासत नाचत…*
सांगा कसे जगायचे हासत नाचत
हातामध्ये घेत हात करावे स्वागत
एक फक्त स्मितरेषा असते पुरेशी
खुलतोच चेहरा नि उमटते खुशी….
न बोलता दोन मने जुळती लगेच
सांगावे मनाला फक्त तू फुले वेच
काटे तर असतात टाळावे खुबीने
हास्याला हास्य भेटे जगावे चवीने…
मुखातील शब्द येतो ओळख सांगत
गोड शब्द बोलावा नि जोडा गणगोत
न्यावयाचे नाही काही धरा हो संगत
आनंदाने रहा करा अंगत पंगत …
फुले द्यावी फुले घ्यावी पेरावे चांदणे
गुलमोहराची छाया शेंदरी हासणे
उद्याने ती फुलवावी सुगंध वाटावा
वागण्याचा आपुला हो वाटावाच हेवा…
आनंद हे जीवन हो करून टाकावे
सुखी करण्याचा मंत्र आहेच स्वभावे
सुख द्यावे सुख घ्यावे साघे हे गणित
पचनी का पडेना हो नाही हो माहित…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)