ते तृतीयपंथी नव्हेच ; युवतीचे अपहरण सुद्धा नाही
नांदगावातील घटनेत ट्विस्ट
कणकवली
नांदगावमध्ये दोघा तृतीयपंथीयांनी एका युवतीला संमोहित करून आपल्या सोबत नेल्याच्या कथित घटनेने २७ मार्च रोजी दुपारी खळबळ उडाली होती. नांदगाव मध्ये स्त्री वेशातील दोघा तृतीयपंथीयांनी एका युवतीला आपल्या सोबत नेल्याची घटना २७ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली होती. जानवली येथे त्या युवतीसह स्त्रीवेशातील तृतीयपंथीय असल्याचा संशय असलेल्यापैकी एक त्या युवतीसह नांदगावमधून सहा सिटरने कणकवली च्या दिशेने निघाला. जानवली पेट्रोल पंपानजीक त्या स्त्रीवेशातील कथित तृतीयपंथीयाला त्या युवतीने अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा सहा सीटर मधील अन्य प्रवासी घाबरले, आणि रिक्षा चालकाने रिक्षा पेट्रोल पंपावर आणली. नंतर स्थानिकांनी कणकवली पोलिसांना याबाबत कळविल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हवालदार सुपल, हवालदार विनोद चव्हाण यांनी जाणवली येथे जाऊन दोघांनाही कणकवली पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर नांदगाव मध्ये असलेल्या तृतीयपंथीय असल्याचा संशय असलेल्या दुसऱ्या व्यक्तिलाही कणकवली पोलिस ठाण्यात आणून पोलिसांनी अधिक चौकशी केली असता साडी आणि ब्लाऊज असा स्त्री वेश परिधान केलेले ते दोन्ही तृतीयपंथी नसून पुरुष असल्याचे निष्पन्न झाले. दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते बुलढाणा जिल्ह्यातील असून दोघेही आपल्या पत्नी मुले व अन्य कुटुंबीयांसह कुडाळ येथे मागील काही दिवसांपासून राहत आहेत. तृतीयपंथी नसूनही स्त्रीवेश परिधान करण्यामागे भिक्षा मागणे सोपे जाते म्हणून स्त्रीवेश परिधान केल्याचे दोघांनी पोलिसांना सांगितले. त्या दोघांच्या पत्नी व मुले अन्य नातेवाईक महिलांसह कणकवली पोलिस ठाण्यात आले होते. दरम्यान सदर कथित अपहरण झालेल्या युवतीची मनस्थिती ठीक नसल्याने त्या युवतीला पोलिसांनी कुडाळ येथील एका मनोविकार तज्ञाकडे नेण्यात आल्याची माहिती मिळाली असून अधिक माहिती सांगण्यास उपनिरीक्षक हाडळ यांनी नकार दिला. या घटनेची रात्री साडेसात वाजेपर्यंत पोलिस ठाण्यास नोंद नसल्याचे ठाणे अंमलदार उज्वला मांजरेकर यांनी मिडियाला सांगितले.