*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित कवितेचं लेखिका ऐश्वर्या डगांवकर यांनी केलेलं रसग्रहण*
*कालचक्र*
〰️〰️〰️〰️
काळ केंव्हा कसा हरवुनी गेला
उमजूनी देखील कळलेच नाही
आठवां आता कशाला उसवावे
भोगणे भोगायचे टळलेच नाही
भावभावनांची उलघाल असह्य
क्षणभरही कधीच थांबली नाही
जाहले प्रारब्धही निःशब्द आता
शून्यावीण जगी दुजे सत्य नाही
क्षणक्षण बुडणारा बुडूनी जातो
परतुनी तो तर कधीच येत नाही
घडणारे ते ते सारेच घडुनी जाते
कालचक्र तर कधी थांबत नाही
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*©️वि.ग.सातपुते. (भावकवी )*
*📞(9766544908)*
*****************
*रसग्रहण -कालचक्र*
काळ कधीच कुणासाठी थांबत नसतो.आपल्याला हे जाणवून देखील आपण नजर अंदाज करत रहातो.
जुन्या आठवणींना उगाच उजाळा देण्यात काय अर्थ आहे.
काय चुकलं काय टाळता आलं असतं याचा हिशेब मांडण्यात काही अर्थ नाही.कारण केलेल्या चांगल्या वाईट कर्मांची फळं आपण भोगून चुकलो.
मनात सतत भावनिक आंदोलनं सुरूच असतात.काय खरं काय खोटं कोणी आपला मानापमान ठेवला आपण कुणाशी कसं वागलो यांचे विचार मनात येतच रहातात.ते क्षणभरही आपण विसरू शकत नाही.
आता हे सर्व काही भोग देऊन नियती पण चूपचाप बसली आहे.हाती काहीच उरले नाही.जीवनाची वजाबाकी करत करत हाती शून्य उरलं आहे.आणि हेच सत्य आहे.जीवनाचे कटू सत्य आहे.
हातून निसटलेले क्षण परत कधीच येत नाही.उगाच पश्चात्ताप करण्यात अर्थ नाही.त्यापेक्षा कुठलेही कर्म करण्याआधी मग ते वाचिक असो कायिक असो पारिवारिक असो वा सामाजिक विचार करून करणे गरजेचे आहे.ही शिकवण या कवितेतून वि.ग.सा.नी दिली आहे
जीवनात जे जे घडायचे असते ते समयानुसार घडतंच .कारण
कालचक्र हे कधीच कुणासाठी थांबत नाही.ते तर अविरत चालूच रहाते.असं भगवद्गीतेत
भगवान श्रीकृष्णांनी पण सांगितले आहे.तेच वि.ग.सा आपल्या कवितेतून सांगत आहे.पण मनुष्यस्वभाव आहे की तो नेहमी कर्म करताना होणा-या परिणामाचा विचार करत नाही आणि मग नियतीला
सदैव दोष देत रहातो.त्यामुळेच हात चोळत बसण्याखेरीज काही उरत नाही.त्याच्या या वागण्यामुळे नियती पण आता स्तब्ध झाली आहे.
अतिशय छान कविता.ही कविता वाचतांना ज्येष्ठ कवी केशवसुत यांची’ घड्याळ ‘
कविता आठवली.
*सौ. ऐश्वर्या डगांवकर , रावेत पुणे*
भ्रमणध्वनी -९३२९७३६६७५.