मालवण बसस्थानकाचा स्लॅब कोसळून महिला प्रवासी गंभीर जखमी…
मालवण
येथील बस स्थानकाच्या जुन्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग महिला प्रवासीच्या डोक्यावर पडल्याची घटना आज सकाळी येथील बस स्थानकात घडली. यात प्रवासी महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या इमारतीचा स्लॅब धोकादायक बनला असतानाही त्या दृष्टीने एसटी प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
येथील बस स्थानकाची जुनी इमारत धोकादायक बनली आहे. काही वर्षांपूर्वी या इमारतीचा स्लॅब कोसळून प्रवासी जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. सद्यस्थितीत बस स्थानकाच्या नव्या इमारतीचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवासी बस स्थानकाच्या जुन्या इमारतीतच आपल्या बसची वाट पाहत बसतात. आज सकाळीच बेळगाव येथून एक दांपत्य आचरा येथे असणाऱ्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी येथील बस स्थानकात आचरा बस फेरीची वाट पाहत बसले असता अचानक स्लॅबचा काही भाग महिला प्रवाशाच्या डोक्यावर पडला. यात ती गंभीर जखमी झाली. अचानक स्लॅब कोसळल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. जखमी महिलेला एसटीच्या अधिकाऱ्यानी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर स्लॅबचा पडलेला भाग तेथून हटविण्यात आला.
सद्यस्थितीत बस स्थानकाच्या जुन्या इमारतीमध्ये प्रवासी बसफेरीची वाट पाहत बसतात. जुन्या इमारत धोकादायक बनली असल्याने त्याचा स्लॅब कोसळून प्रवासी जखमी होऊ नये याची दखल एसटी प्रशासनाने घेऊन आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र अशा कोणत्याही उपाययोजना करण्यात न आल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.नवीन बसस्थानकाचे काम अद्यापही पूर्ण न झाल्यानेच ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे नवीन बस स्थानकाची इमारतीचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.