*दिल्ली कॅपिटल्सचा थरारक विजय: आशुतोष शर्माची तुफानी खेळी!*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
२४ मार्च २०२५– इंडियन प्रिमियर लीगच्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सवर अविस्मरणीय विजय मिळवला. २१० धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने १९.३ षटकांत ९ विकेट्स गमावत २११ धावा करत रोमांचक विजय मिळवला. आशुतोष शर्मा यांच्या स्फोटक अर्धशतकाने दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०९/८ अशी भक्कम धावसंख्या उभारली. निकोलस पूरनच्या ७५ (३०) आणि मिचेल मार्शच्या ७२ (३६) धावा संघासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. दिल्लीच्या मिचेल स्टार्कने ४ षटकांत ४२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. ७ धावांवर ३ विकेट्स पडल्याने संघ अडचणीत होता. मात्र, आशुतोष शर्मा (६६ धावा, ३१ चेंडू, ५ चौकार, ५ षटकार) आणि विप्राज निगम (३९ धावा, १५ चेंडू, ५ चौकार, २ षटकार) यांनी संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. शेवटच्या षटकांत दिल्लीला ८ धावांची गरज असताना त्यांनी ३ चेंडूत सामना जिंकला. दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा १ गडी राखून पराभव केला. आशुतोष शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा रोमांचक सामना चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरला. त्यामुळे आयपीएल २०२५ च्या आगामी सामन्यांसाठीही अशीच उत्कंठा टिकून राहणार आहे.
*उद्याचा सामना:-*
गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज संध्याकाळी ७:३० वाजता नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद