रेडीरेकनरचे दर वाढवू नका…..
सावंतवाडी क्रेडाईचे दुय्यम निबंधकांना निवेदन
सावंतवाडी
सरकार दरवर्षी १ एप्रिल पासून मूल्यांकन तक्ते लागू करते, मात्र मार्केटची सद्यस्थिती बघता, या आर्थिक वर्षात मुल्यांकनात वाढ होऊ करु नये, अशी मागणी सिन्नर क्रेडाईच्या वतीने करण्यात आली असून, यासंदर्भात सावंतवाडीचे दुय्यम निबंधक तेरगावकर मेडम यांना निवेदन देण्यात आले आहे.
वाढत्या मुल्यांकनामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी येऊन याचा परिणाम थेट बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यावर होत असतो. सद्यस्थितीत मार्केटच्या सर्व्हेनुसार रिअल इस्टेट क्षेत्रात अत्यंत मरगळीचे वातावरण असुन, बांधकाम क्षेत्रामध्ये एकंदरित मंदीची स्थिती आहे. त्यामुळे आर्थिक वर्षात मुल्यांकनात दरवाढ करू नये तसेच मूल्यांकन तक्ते व मार्गदर्शक सूचना नियमावली हे दोन वेगवेगळे भाग करण्यात यावे. जमीन मालक व विकासक यांच्या दरम्यान ठरलेल्या व्यवहारातील जमीन मालकांना मिळणाऱ्या हिश्श्याच्या मूल्यांकनावर मुद्रांक शुल्क आकारावे, स्थूल जमिनीचे मूल्यांकन कोष्टक अ आणि ब मधील टक्केवारी १०% ने कमी करण्यात यावी, अँमिनिटी प्लॉटचा दर तेथील इतर प्लॉटच्या दराच्या ४०% पर्यंत असावा, २००० चौ.मी. पर्यंतचे विकसन करारनामे करण्यासाठी प्रोजेक्ट अँडज्युडीकेशन करण्याचे अधिकार दुय्यम निबंधकांना देण्यात यावे, उद्वाहक असलेल्या इमारतींसाठी पाचव्या मजल्यापासून वाढणारे मूल्यांकन आठव्या मजल्यापासून लागू करावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
याबाबत बांधकाम व्यावसायिकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवून त्यावर सरकारने सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा यावेळी करण्यात आली. यावेळी क्रेडाई सावंतवाड़ी संघटनेचे अध्यक्ष नीरज देसाई , उपाध्यक्ष शरद सावंत , सचिव गोविंद खोर्जुवेकर , कार्यकारिणी सदस्य प्रवीण परब,सतीशचंद्र बागवे आदी उपस्थित होते.