You are currently viewing “गेली वीस वर्षे तेच ते, तेच ते’…

“गेली वीस वर्षे तेच ते, तेच ते’…

“गेली वीस वर्षे तेच ते, तेच ते’…

… अॅड. नकुल पार्सेकर

सावंतवाडी

सावंतवाडीचे शासकीय रुग्णालय हा खरोखरच चेष्टेचा विषय आहे. एकंदरीत गेल्या वीस वर्षांतील या कुटीर रुग्णालयाचा दरिद्री कारभार पहाता मला जेष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक स्व. विं. दा. करंदीकर यांची कविता आठवली… सकाळपासून राञीपर्यंत तेच ते.. तेच ते.. या कुटीर रूग्णालयाच्या बाबतीत गेली वीस वर्षे तेच ते सुरू आहे.
निवडणूका संपल्या. सरकारने जवळपास तीन महिने पूर्ण केले. या सावंतवाडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमचे सर्वांचे सदासर्वकाळ लाडके असलेले आदरणीय भाई पुन्हा निवडून आले. यावेळी पण त्यानी मल्टीस्पेशालीटीचे मधूर गाजर मतदारांना दाखवले आणि पुन्हा चौथ्यांदा भाई प्रचंड बहुमताने निवडून आले. समर्थांकानी गुलाल उधळला आणि मल्टीस्पेशालीटीचे आश्वासन त्या गुलालात गायब झाले.
मुळात मल्टीस्पेशालीटी पेक्षा जे कुटीर रुग्णालय आहे त्या ठिकाणीच जर आवश्यक सुविधा केल्या तरी सर्वसामान्य रुग्णाना दिलासा मिळू शकतो. भूलतज्ज्ञ, फिजिशियन नसल्याने खेड्यापाड्यातून आलेल्या रुग्णाना जीव वाचवण्यासाठी बांबुळी हाच एकमेव पर्याय. गोव्यातील ट्राफिकमुळे तेथे पोहचेपर्यंत पेशंट जीवंत राहील की नाही? याची शाश्वती नाही.
आवश्यक डॉक्टरा़ंची वानवा, औषधांचा तुटवडा, अपूरे कर्मचारी, सुरक्षा रक्षक फक्त कागदावरचं आहेत. चार सुरक्षा रक्षक मंजूर आहेत. प्रत्यक्षात त्या ठिकाणी एकच सुरक्षा रक्षक काम करतो जो वेंगुर्ला येथून कामगिरीवर आहे. गेल्या काही महिन्यांचा त्यांचा पगारही झालेला नाही.
निवडणूकीत तब्बल सहा वेळा आदरणीय माजी मंञ्यानी जाहीर केले होते की राजघराण्याने मान्यता दिली आता जमीनीचा प्रश्न सुटला. प्रत्यक्षात राजघराण्यातील मा. युवराजे,राणीसाहेब व मा. बाळराजे यांनी संमती दिली असली तरी त्यांच्या कुटूंबातील आणखीन एका व्यक्तीची संमती मिळालेली नाही. हे वास्तव असताना अशा घोषणा कशा काय होतात? अर्थात सावंतवाडी मतदारसंघातील मतदारांना गेली वीस वर्षे घोषणावर जगण्याची सवय झालेली आहे.
लोकप्रतिनिधी खरे तर आरोग्य, शिक्षण अशा विषयावर गांभीर्याने पाहिले पाहिजे, पण दुर्दैवाने हे होताना दिसत नाही. आज सावंतवाडी येथील कुटीर रूग्णालयाच्या समोर सामाजिक बांधिलकी संघटना व इतर काही सजग सामाजिक कार्यकर्ते या विषयासाठी आंदोलनाला बसले होते. यापूर्वी पाच ते सहा वेळा आम्ही आंदोलन केली पण आश्वासना शिवाय काही पदरी पडले नाही.
आज पुन्हा एकदा आंदोलनकाना आश्वासन देण्यात आलेले आहे. पुन्हा नेहमी प्रमाणे आशेवर जगायला काय हरकत आहे? गेली वीस वर्षे तेच ते.. तेच ते…

प्रतिक्रिया व्यक्त करा