You are currently viewing कोकण मराठी साहित्य संमेलन २०२५ ला “फिरते कविसंमेलन -२०२५” ने मालवण कोमसापची मानवंदना

कोकण मराठी साहित्य संमेलन २०२५ ला “फिरते कविसंमेलन -२०२५” ने मालवण कोमसापची मानवंदना

*कोकण मराठी साहित्य संमेलन २०२५ ला “फिरते कविसंमेलन -२०२५” ने मालवण कोमसापची मानवंदना*

*फिरते कविसंमेलन संमेलनाध्यक्ष श्री गंगाराम गवाणकर यांना अर्पण*

मालवण:

सावंतवाडी येथे २२ मार्च रोजी कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित जिल्हा साहित्य संमेलन- २०२५ मोठ्या दिमाखात पार पडले. सावंतवाडीतील या कवी संमेलनाला मानवंदना देण्यासाठी कोकण मराठी साहित्य शाखा मालवणचे तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर गुरुजींनी अभिनव अशी संकल्पना मांडली आणि ती सत्यात उतरवली ते म्हणजे मालवण ते सावंतवाडी दरम्यानच्या प्रवासात चालत्या गाडीत संमेलनासाठी येणाऱ्या कवींचे “फिरते कवी संमेलन” घेण्याची..! सुरेश ठाकूर गुरुजींच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून सावंतवाडी येथील कवी संमेलनात निवडक कवी सहभागी होत असले तरी फिरत्या गाडीत सर्वच कवींना कविता सादरीकरणाची संधी आणि आनंद दोन्ही प्राप्त झाले. या फिरत्या कवी संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ मालवणी कवी रुजारियो पिंटो व कवयित्री अर्चना कोदे यांनी केले. सावंतवाडी येथील कवी संमेलनाच्या दरम्यान कोमसाप मालवणच्या सदस्यांनी फिरते कविसंमेलन संमेलनाध्यक्ष वस्त्रहरणकार श्री.गंगाराम गवाणकर यांना अर्पण केले.

*कवी संमेलनाचा उद्देश….*
साहित्य रुजवणे आणि नवीन साहित्यिक निर्माण करणे आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या शिलेदारांना अनोखी मानवंदना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सुरेश ठाकूर गुरुजींनी सांगितले. फिरत्या संमेलनासाठी आचरा येथील कवी मंदार सांबारी यांनी खास शीर्षक गीत रचले होते. काव्यपुष्पाचे प्रतीक म्हणून कवींनी हाती गुलाबपुष्प घेत गीत सादर केले. कोमसापचे जिल्हा समन्वयक कवी रुजारियो पिंटो यांनी देखील सहभाग घेत मालवणी कवितेने कवी संमेलनात रंगत आणली.

*या कवींनी घेतला सहभाग*
फिरते कविसंमेलन – २०२५”* अंतर्गत ‘आचरा ते सावंतवाडी’ या प्रवासादरम्यान बसमध्ये तब्बल वीस कवींनी आपल्या दर्जेदार कवितांचे सादरीकरण केले. या फिरत्या कवी संमेलनाचे निवेदन कवी रामचंद्र कुबल, ध्वनी व्यवस्था सुरेंद्र सकपाळ, बैठक नियोजन पांडुरंग कोचरेकर तर चित्रीकरण गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले. फिरत्या कवी संमेलनात प्रामुख्याने सुरेश ठाकूर, गुरुनाथ ताम्हणकर, सदानंद कांबळी, पांडुरंग कोचरेकर, श्रुती गोगटे, अर्चना कोदे, रामचंद्र कुबल, सुरेंद्र सकपाळ, विठ्ठल लाकम, सायली परब, संजय परब, महेश चव्हाण, नारायण धुरी, सुगंधा गुरव, मंदार सांबारी, रमाकांत गोविंद शेट्ये, विनोद कदम, अनघा कदम, विनय वझे, मधुरा वझे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी कवींची गाडी चालविणाऱ्या चालकांचा देखील स्नेह सत्कार करण्यात आला.
जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर आणि कोमसाप कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ यानी ह्या ऊपक्रमाचे कौतुक केले, मा.उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी देखील भेट देत उपक्रमाचे कौतुक केले आणि सहभागी वीसही कवीना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा