*सिंधुदुर्गातील वाढत्या तापमानाचा आंबा उत्पादनावर गंभीर परिणाम;
*शेतकऱ्यांची मंत्री नितेश राणे यांच्याकडे मदतीची मागणी*
* शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ,मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन*
कणकवली;
सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेब्रुवारी अखेर पासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, त्यामुळे आंबा बागायतदार मोठ्या अडचणीत आले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे मोहोर गळू लागला असून, तयार होत असलेल्या आंब्यांची गुणवत्ता देखील घसरत आहे. परिणामी, यावर्षी मर्यादित आलेले आंबा उत्पादन आणखी घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंबा व इतर फळबागायतदार संघटनेने मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात वाढत्या तापमानामुळे आंबा उत्पादनाला होणाऱ्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.हे निवेदन संघटनेचे अध्यक्ष विलास रूमडे यांनी दिले आहे.
संघटनेच्या मते, देवगड तालुक्यातील तापमान अन्य तालुक्यांच्या तुलनेत कमी दाखवण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या विमा नुकसान भरपाईवर होत आहे. गेल्या वर्षी अशाच परिस्थितीत योग्य निकष पूर्ण करूनही देवगड मधील शेतकऱ्यांना विमा रकमेचा लाभ मिळालेला नव्हता.
या पार्श्वभूमीवर, बागायतदारांनी विमा योजनेत काही महत्त्वपूर्ण सुधारणा सुचविल्या आहेत. त्यात फुलकीड व फळमाशीच्या प्रादुर्भावाचा समावेश फळ पीक विमा योजनेत करावा, विमा कालावधी १ नोव्हेंबर ते ३१ मे असा करावा, तसेच नुकसान भरपाईसाठी विमा रक्कम मुदत संपल्यावर ४५ दिवसांत वितरित करावी, अशा मुख्य मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय, विमा निर्धारण समितीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन तज्ज्ञ शेतकऱ्यांचा समावेश करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.
ही मागणी मा. ना. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोर अलिबाग येथे झालेल्या बैठकीत सादर करण्यात आली असून, त्याबाबत त्यांना निवेदनही देण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील आंबा उत्पादक चिंतेत असून, शासनाने तातडीने यावर योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच, विमा धोरणात सुधारणा करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी हस्तक्षेप करावा, अशीही विनंती करण्यात आली आहे.यावेळी बलवान सर, रामदास अनुभवणे व इतर उपस्थित होते.