*लालित्य नक्षत्रवेल तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम लेख*
*रुमाल*
मी शाळेमुळे खुप वर्षे लहान मुलांमध्ये राहीली आहे. ते नवे घातलेले कपडे, छोटीशी वॉटर बॅग, टिफीन, इवलेसे शुज, रडणारे डोळे ,फुरफुरणारे नाक, व नाक पुसायला लावलेला सेफ्टीपिनला चौकोनी लटकलेला रूमाल.त्यामुळे अनेकदा ही इवलिशी लहान मुले कोणाचा तरी हात धरून लगबगीने शाळेकडे जातांना सकाळी हमखास भेटतात .
छान स्वच्छ गणवेश ,पायात सॅाक्स व इवलेसे बुट ,पाठीवर न पेलता येणार सुंदर दोन कान असणारं दप्तर ,पाण्याची बाटली व लक्ष वेधून घेणारा तो लहानसा रुमाल . तो चौकोनी घडी करुन सेफ्टी पिनने लटकवलेला , रुमाल माझं सतत लक्ष वेधून घेतं . खरंतर त्या छोटुकल्यांना खूप गोड व भारी दिसतो की विचारू नका . शाळेत नाकाला ‘तूप’ आलं की पुसायला हा आपला ‘जुगाड’ पण झक्कासच !
याच रुमालाने माझं मन मोहून गेल ,आणि त्याची एक एक घडी मोडत चालता चालता शब्दरुपात येऊ लागलं
तसं आमच्यावेळी जवळ किंवा हातात रुमाल हा नसायचाच . ही हात रुमालाची ‘चैन ‘फक्त शहरी मुलांची व नोकरीवर जाणाऱ्या माणसांची असे .
नाही म्हटले तरी घरातिल स्त्रियांच्या मुठीत मात्र एक रुमालाची गुंडाळी अवश्य असायची .माझ्याकडून कायम रूमाल हरवायचा . म्हणून आई जूनाच रूमाल मला द्यायची. लग्न वगैरे समारंभ किंवा सण -वाराला हा वितभर रुमाल हातात हमखास असायचा . पण या वितभर रुमालाचे नानाविध उपयोग पण असायचे . साधं मंदिरात गेलं की प्रसाद बांधून आणायला , कुठे बाजार हाट करायला गेलं की याच रुमालात एका कोपऱ्यात चिल्लर व नोटांची पुरचुंडी दबा धरून बसलेली असायची जणु पोटलीच नां ! कधी कधी याच रुमालात कोणा बाबा बुवांचा अंगारा जपून आणलेला असायचा . तर कधी त्याच रुमालात बडीशेप ,विलायची ,लवंग यांची रेलचेल असायची . कधी आईंचा मंदिरातील प्रसाद असायचा,असा हा रुमाल म्हणजे बहु आयामी , बहुऊपयोगी असे .संक्रातित तर हमखास डोकवायचाच .
माझ्या बाबतित म्हणाल तर माझ्या जवळ क्वचितच रुमाल असायचा ,व बाहेर जातांना अगदी आठवणी ने नेला तरी मी तो हमखास हरवून यायचे ,(तसे हरवणे ही माझी खासियत आहे !) कधी कधी उन्हाळयात डोक्या ला रेल्वे ड्रायव्हर सारखा मात्र बांधत असे पण एकदा आरशात आपले ते रुपडे पाहिल्या नंतर ते कायमचे सोडून दिले व छानशी कॅप वापरायला लागले !
एक मात्र खरं आम्ही लहान पणी ‘धडपडे शास्त्री ‘ होतो व काही जखम वगैरे झाल्यावर याचा उपयोग होत असे .अहो ,एस टी मधे सीट नावाची प्रॅापर्टी , मी जळगांव – वरणगांव प्रवासात MA लाअनेकदा आपल्या नावावर लगोलग करून घेतली आहे .!
तुम्हाला सांगते ,त्याकाळी प्रेमी युगुलांचं हा हातरुमाल म्हणजे संवादाच एक माध्यम होतं .एकमेकांना भेट म्हणून दिलेला रुमाल म्हणजे जणु काळजाचा तुकडा असायचा व तो जिवापाड जपलाही जायचा .
काळ बदलत गेला ,रुमालाने कात टाकली ,वीत भर रुमाल आता हातभर झालाय ,त्याचे स्कार्फ असे गोंडस नाव झाले .आताशा ,कधी तरी कुठेतरी पर्स मधे हातरुमाल असतो ,पण त्याच अस्तित्व तसं कमीच झालंय ,त्याची जागा मात्र टिश्यू पेपर वा सुगंधी पेपरने घेतली आहे .
असे असले तरी पुरुषांनी मात्र ही परंपरा मनापासून जपली आहे . पुरुषांच्या पॅंटीच्या खिशात जवळ पास हा असतोच .कोटाच्या वरच्या खिशातून आपलं त्रिकोणी डोकं बाहेर काढत ‘मी अजुनही आहे बरं काम ‘ हे सांगत आपल्या छातीशी असणारा हा हातरुमाल आपलं महत्व अधोरेखित करत असतो .
या रुमालाची अनेक रुप व उपयोग आहेत , नववधूजवळ ओटी भरतांना तो हातात येतो व कायम रडतांना, डोळ्याजवळच. कधी कंबरेला खोचला असतो तर कधी पोळ्यांवर! हमाल ,कष्टकरी यांच्या मानेवर विसावणारा व त्यांचा घाम पुसणारा हाच तो पट्कन हाताशी येणारा रुमाल ,तर जादुगाराच्या हातचलाखीला अगदी सहज धावून येणारा व तेव्हा वाजणाऱ्या टाळ्या व लहान मुलांचे हास्य बघून त्या रुमालाच्या अंगावर नक्कीच नक्कीच मूठभर मांस चढत असणार !(जादूगार शुध्द शाकाहारी असला तरी )
छोटासा असला तरी सगळ्या जीवनाची अस्वच्छता स्वत:धारण करून दुसऱ्याला स्वच्छ आणि सुंदर बनवणारा असा हा रुमाल .आपलं दु:ख सावरणारा रुमाल . आपलं छोटंस विश्व व्यापल्यालेला हा बहुऊपयोगी रुमाल आपली सर्व दु:ख व वेदना पुसत आपल्या अवति भवति मिरवत असतो .
मला तर वाटतं ,माणसाचं आयुष्य हे असं रुमाला सारखे दिसल्याचे दु:ख पुसणारं ,दुसऱ्याचेही अश्रु टिपणारं असावं .
योगिनी पैठणकर नाशिक
****************