You are currently viewing स्मृति भाग ५०

स्मृति भाग ५०

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ५०*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आज १५ जून २०२० तारीख . आज *” आंतर्राष्ट्रीय हवा दिन ” असे माझ्याजवळ असणार्‍या एका कॅलेंडरवर लिहीले आहे . ज्या संस्कृतीने मातृदिन , नागपंचमी , बैलपोळा , डोंगर्‍यादेव , श्राद्धदिवस वा पितृपक्ष , इ. सर्व प्रकारचे श्रद्धेने ज्यांची आठवण काढली पाहिजे ते सगळे भारतातील आदिवासी वा वनवासी जनांपर्यंत पोहोचवले !! त्यांची नावे आम्हाला फक्त बदलून आम्हास सांगितले गेले की , आज पर्यावरण दिवस , आज मदर्स डे , आज शिक्षक दिन !!!! आम्ही आनंदाने पाळतो !! आमची बुद्धिमत्ता इतकी खालावली आहे . त्यात आज *आंतर्राष्ट्रीय हवा दिन* वाचल्यावर मला हा अतिरेक वाटतो . तसेच , माझ्या देशातील स्वातंत्र्यानंतर देशाला दिशा दाखवणार्‍या बुद्धिमंतांची लाज वाटते !!! तशीच काहीशी गोष्ट आज चर्चेत येत आहे . ती ही पाहूच !!

काल आपण जे वर्णन पाहिले , त्यातील द्विप आणि सागर वर्णन वाचले की पहिल्या युगात जन्माला आलेल्या ऋषिंचा भूगोलाचा अभ्यास किती झाला असेल व तो कसा केला असेल ? हा प्रश्न ज्याला पडत नसेल तो पशुतुल्यच ना ? सीतेचा शोध घेण्यासाठी सुग्रीवाने वानरांना कुठे कुठे पाठवले ? ते जर तुम्ही वर्णन वाचाल ना तर आजचे भूगोलाचे शिक्षक फिके पडतील !!!!! असे वर्णन आहे ! तर देश चालवणार्‍या संरक्षण मंत्री ( त्या काळात व मुसलमानी पहिल्या आक्रमणापर्यंत भारताचे इतिहासात *युध्दमंत्री* पद होते , संरक्षण मंत्री नाही ! संरक्षण मंत्री ही अल्पमतिंची देणगी वाटते आम्हास !! ) वा गृहमंत्र्यांचा कसा अभ्यास असावा याचे ते उत्तम उदाहरण आहे . लाजिरवाणे होवून मिळालेल्या सांसदेतील पदात अस्मिताच नसते तर बुद्धिमत्ता कुठून असेल ??

आज आपण *लिखित* स्मृतिबद्दल पहाणार आहोत . ती इष्ट व पूर्त कर्म , वृषोत्सर्गफल , षोडश श्राद्ध , पिण्डदान इ. विषय येतात . एकूण फक्त ९३ श्लोक असणारी ही स्मृति आहे . पाहु या काही श्लोकांबद्दल !

 

*एष्टव्या बहवः पुत्रा यद्येकोSपि गयां व्रजेत् ।*

*यजेत वाSश्वमेधेन नीलं वा वृषमुत्सृजेत् ॥*

पुष्कळ पुत्रांची इच्छा केली पाहिजे . कुणी गया जाईल ! कुणी अश्वमेध यजन करेल ! कुणी नील वृषोत्सर्ग करेल !

पुष्कळ पुत्रांची इच्छा करायला आज सांगणं किती हास्यास्पद वाटते ना ? पण आज २०२० या सालात पाकिस्तान वा चीन धार्जिण्या भारतीयांची नीति पाहिली की एका पुत्रावर भागणं शक्य नाही , असं वाटतं ना ? आजकाल टीव्ही बातमी पण सुरु आहे की चिनी सेनेत जे आपल्या घरचे एकटे लाल आहेत असे भरपूर असल्याने घनघोर युद्धात ते पळ काढू शकतात , अशी शक्यता आहे !! गावात ही जगतांना ज्याचे जास्त गोत वा पुत्र त्याचे नियम !! वा ज्याचे जास्त पुत्र त्याची शक्ति वा त्याचे नियम !! असा ही न्याय बर्‍याचदा जाणवतो ना ? मनुस्मृतिमधेसुद्धा पुष्कळ पुत्रांची इच्छा असणारा श्लोक आहे . शिवाय गया जाणं ( श्राद्धनिमित्त ! ) वा यज्ञ करणं वा वृषोत्सर्ग करणं , ह्या तीन कार्याची तरी अपेक्षा ऋषिंनी प्रत्येक पुत्राकडून आपल्या आईवडिलांसाठी केलेली आहे , हे कसं विसरता येईल !! वृद्धाश्रमात ठेवल्या जाणार्‍या आईवडिलांचे काय पाप असावे की त्यांना आश्रम पहावा लागतो ??? या पोरांना गुरुकुलातील शिक्षणापासून असरकारी ( अ—सरकारी ) सरकारच दूर ठेवते व भाकरीचे शिक्षण मिळणार्‍या शाळांमधून स्वातत्र्यवीरांचे इतिहासा ऐवजी वा ऋषिचरित्राऐवजी उत्तम दास्यत्वाचे शिक्षण दिले जाते आणि चातुर्वर्णामधील शूद्रत्वाविरोधी बोंबा मारल्या जातात !!! या लोकशाहीपेक्षा रामराज्य कधीही चांगले ना ! स्मृतिंचे अनुषंगाने पुढे रामराज्याचा आजवर न उलगडलेला पैलू मी मांडेनच !! आता दुसरा श्लोक पाहू .

 

*स्वगोत्राद् भ्रश्यते नारी उद्वाहात्सप्तमे पदे ।*

*भर्तृगोत्रेण कर्तव्यं दानं पिण्डोदकक्रियाः ॥*

विवाहातील सप्तपदी पश्चात् नारी आपल्या गोत्रापासून अलग होते . तिच्यासाठी दान आणि पिण्डोदक क्रिया पतिच्या गोत्रानुसार केल्या जातात .

ज्या स्त्रिया माहेरचे व सासरचे अशी दोन ही आडनावे लावतात , त्या करत असलेल्या चुकीसाठी हा श्लोक आहे . कारण त्यांचे शास्त्रविरुद्ध कृतीत समर्पण भावनाच नसते . आणि मूर्खपणाचे पुरोगामित्व दाखविण्याचा सुंदर शहाणपणा असतो . मला ती निलाजरी कृति वाटते . तीच गोष्ट आपले नाव , मग आईचे नाव , मग वडिलांचे नाव , मग आडनाव , असे पूर्ण नाव लिहीणार्‍यांबाबत ही आहेच !! या जगात आई प्रिय नसणारी व्यक्ति नसावीच कदाचित् !! पण आईचे नाव पूर्ण नावात टाकणे हा रुढीविरुद्ध वा शास्त्रविरुद्ध केलेला अतिरेक वाटतो आम्हास !!

आता वैश्वदेव हे इष्ट कर्म आहे . पण विश्वदेव किती वा कोणते ? हे मलाही , हे वाचन होईपर्यंत कुणीही सांगितले नाही !!!!! ते पाहू .

 

*क्रतुर्दक्षो वसुः सत्यः कालकामौ धृतिलोचनौ ।*

*पुरुरवार्द्रवश्चैव विश्वेदेवाः प्रकीर्तिताः ॥*

क्रतु , दक्ष , वसु , सत्य , काल , काम , धृति , लोचन , पुरुरवा आणि आर्द्रव हे विश्वदेव मानले गेले आहेत .

या श्लोकावर कृपया विद्वद्जनांनी प्रकाश टाकावा , ही विनंती करतो .

आज थांबतो . तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा