*विरारमध्ये ‘जागर स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीला उत्साहपूर्ण मानवंदना*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
विरार येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ‘जागर स्त्रीशक्तीचा’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रोत्साहनाने हा विशेष सोहळा विजयानंद पाटील रंगायतन, जुने विवा महाविद्यालय येथे २१ मार्च २०२५ रोजी संपन्न झाला.
अहिल्यादेवींच्या जीवनगाथेचे नाट्यमय सादरीकरण: बाल अहिल्येची भूमिका कु. स्नेहा घाडगे हिने साकारली, तर मोठ्या अहिल्येची भूमिका कु. अनुश्री शिंदे हिने सादर केली. त्यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
नृत्य, संगीत आणि साहसदृश्यांची अनुपम मेजवानी: ऐतिहासिक करपल्लवी प्रकारात नवनाथ शिंदे व अमित शिंदे यांनी गुप्त कलांचे सादरीकरण केले.
छावा चित्रपटाचे साहसदृश्य दिग्दर्शक भार्गव शेलार यांच्या मर्दानी खेळांनी प्रेक्षक स्तिमित झाले. संगीताची जबाबदारी सिद्धेश लाड आणि श्री संजय बालसाने यांनी उत्तम प्रकारे सांभाळली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन परेश दाभोळकर यांनी केले. सुप्रसिद्ध गायक विजय कर्जावकर, पूजा सावंत (जय जय महाराष्ट्र फेम) आणि दिनेश नाडकर यांच्या सुमधुर गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गिनीज रेकॉर्ड होल्डर भावना चौधरी पाटील यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्स, भारत संस्थेच्या नर्तकांनी अप्रतिम नृत्याविष्कार सादर केला.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर सचिव विकास खारगे (भा. प्र. से.) यांच्या संकल्पनेतून व सांस्कृतिक कार्य संचलनाचे संचालक बिभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घडवून आणण्यात आला. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अमेय पाटील यांनी या कार्यक्रमाचे देखणे दिग्दर्शन केले.
श्री विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे या उपक्रमाला संपूर्ण सहकार्य लाभले. ट्रस्टचे श्री. पिंगुळकर, उपप्राचार्या डॉ. दीपा वर्मा, उपप्राचार्या श्रीमती परांजपे, प्राचार्या मुग्धा लेले, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. कोमल पाटील आणि सृजनचे संदीप पाठक यांनी उत्कृष्ट व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सर्व कलाकारांचा गौरव करण्यात आला. विरारमधील अनेक मान्यवर तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्यावर प्रेम करणारे असंख्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. हा कार्यक्रम केवळ एक सांस्कृतिक उत्सव नव्हता, तर स्त्रीशक्तीचा जागर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याला सन्मानपूर्वक अभिवादन होते.