विशेष संपादकीय…..*
*सावंतवाडी रुग्णालयात वाजतेय मृत्यूची घंटा..?*
*पालकमंत्री सर्वसामान्यांना न्याय देतील का..?*
सावंतवाडी कुटीर रुग्णालय म्हणजे एकेकाळी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची जीवनदायिनी होती. जिल्हा रुग्णालय ओरोस येथे स्थलांतरित झाल्यानंतर सावंतवाडीच्या कुटीर रुग्णालयाचे रूपांतर नावापुरतेच उपजिल्हा रुग्णालयात झाले असून आजच्या घडीला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणण्या सारखेच आहे. अत्यवस्थ रुग्ण सोडाच साधा तापाचा रुग्ण देखील एवढ्या तत्परतेने गोव्यातील बांबुळी येथील जीएमसी येथे पाठविण्यात येतो जणू हे रुग्णालय असून नसल्यासारखेच आहे. त्यामुळे गावागावातून रुग्णालयात सरकारी खर्चात कमी पैशात उपचार मिळतील म्हणून येणाऱ्या रुग्णांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूची घंटा वाजते की काय..? असा प्रश्न पडतो.
सावंतवाडी तालुक्यात म्हणावे तशा सुविधा असणारे एकही खाजगी रुग्णालय नाही. अनेक रुग्ण आपला महिन्यातून एकदा केली जाणारी तपासणी देखील कुडाळ येथील खाजगी दवाखान्यात करून घेतात. रुग्णांना जास्तच गंभीर आजार असेल तर तालुक्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर गोवा, कोल्हापूर आदी शहरांतील आरोग्य सेवांवर अवलंबून आहेत. याचे कारण म्हणजे सावंतवाडी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूची घंटा वाजत असणाऱ्या सुविधा..आणि त्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री व स्थानिक आमदार यांचा होणारा अक्षम्य दुर्लक्ष..! त्यामुळे निघालेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये..
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा विस्तार आणि दाखल होणाऱ्या तालुक्यातील रुग्णांची संख्या पाहिली असता रुग्णालयाला चांगला फिजिशियन, हृदयरोग तज्ञ, न्यूरोलॉजिस्ट आणि कायमस्वरूपी भूलतज्ञ. कारण सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून आहेत ती आजुबाजूची अनेक खेडी..विस्तारलेले शहर. शहरातील कितीतरी रुग्ण साधा ऍसिडिटीचा त्रास असला तरी कुडाळ, गोवा, कोल्हापूर असा पर्याय निवडतात परंतु सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची पायरी चढताना त्यांच्या छातीत धडकी भरते, किंबहुना कळच येते. त्यामुळे सावंतवाडीत उपजिल्हा रुग्णालय हे रुग्णांच्या सेवेत आहे की कर्मचाऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत आहे असा सवाल उपस्थित होतो.
सावंतवाडी रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून दाखल होणारे अधिकारी रुग्णालयाला वाऱ्यावर सोडतात. पूर्वी डॉ.पाटील असताना देखील अशीच दयनीय अवस्था होती. आतातरी रुग्णालयाची परिस्थिती सुधारेल अशी आशा असताना अजूनही परिस्थिती जैसे थे असल्याचेच दिसून येते. सध्या कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधीक्षक यांचा देखील रुग्णालयाकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते आणि त्याचा फटका सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना बसत आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाला चांगला वैद्यकीय अधीक्षक मिळणे क्रमप्राप्त आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रुग्णालयाला चांगला वैद्यकीय अधीक्षक आणि रुग्णालयातील हृदयरोग तज्ञ, फिजिशियन, न्यूरोलॉजिस्ट यांची नियुक्ती करावी. रुग्णालयातील अशी अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने रात्रीच्या वेळी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना स्वतःचे प्राण गमवावे लागत आहेत. रुग्णालयात सर्जन उपलब्ध आहेत परंतु कायमस्वरूपी भूलतज्ञ नसल्याने रुग्णांची ऑपरेशन करण्यात दिरंगाई होते, पुढे ढकलली जातात. त्यामुळे छोट्या छोट्या ऑपरेशन साठी दाखल करण्यात येणारे रुग्ण नाविलाजाने गोवा आदी पर्याय स्वीकारतात किंवा रुग्णालय प्रशासन त्यांना जबरदस्तीने गोव्यात पाठवते. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करण्यासारखा प्रकार उपजिल्हा रुग्णालयात सुरू असल्याचे दिसून येते.
रुग्णालयात चांगले डॉक्टर आणि सिटीस्कॅन मशीन आणून आरोग्य व्यवस्था सुधारणार नाही तर त्यासाठी रुग्णालयाची साफसफाई, स्वच्छता हा महत्त्वाचा घटक आहे. यासाठी आवश्यक ती पदे भरून सफाईगार (कटर) आदींची नियुक्ती होणे अत्यावश्यक आहे. यापूर्वीच्या पालकमंत्र्यांकडे सावंतवाडीकरांनी आशेने पाहिले होते परंतु म्हणावी तशी अपेक्षा पूर्ण करण्यात सर्वच पालकमंत्री कमी पडले होते. गेल्या तीन महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून ओळख असणारे नाम.नितेश राणे यांची नियुक्ती झाली असल्याने जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत…आणि त्याचे कारणही आहे ते म्हणजे नाम.नितेश राणे सांगतात की, केवळ जिल्ह्यातील कोणत्या सुविधा अपेक्षित आहेत तेवढ्या सांगा, आपण जिल्ह्याचा विकास करण्यास कटिबद्ध आहे…!
परंतु….
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील असुविधा आणि आवश्यक वैद्यकीय अधिकारी यांच्या पूर्ततेसाठी जनतेला रस्त्यावर उतरण्याची वेळ येणे हे जिल्ह्यातील तमाम जनतेचे दुर्दैव आणि मंत्री आमदार, खासदार यांचे अपयश आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही…!!!!!