अपघात प्रकरणी निर्दोष मुक्तता
ॲङ परशुराम बाबुराव चव्हाण यांचा यशस्वी युक्तिवाद
दोडामार्ग
दि. ०३/०८/२०२३ रोजी श्रीकृष्ण राऊत हे एस.टी.बस क्रमांक MH- 14-BT-3871 ही बस घेवून सकाळी १०.१५ वाजता विजघर ते दोडामार्ग असे प्रवासी भरुन दोडामार्ग येथे येण्यास निघाले. त्यावेळी सकाळी १०.३० वा.चे दरम्याने घाटीवडे येथील त्यांचे उजवे बाजुकडील वळणाऱ्या वळणावर आले असता अचानक समोरील वळणावरुन विजघरच्या दिशेने जाणारी एक एस. टी. बस क्रमांक MH-14-BT-3974 भरधाव वेगात आली.
सदर बसचे चालक सर्वेश प्रमोद घाडी यांनी समोरील एस. टी. बस पाहून अचानक ब्रेक लावल्याने त्यांच्या ताब्यातील बस स्लीप होवून डावे बाजूस रस्ता सोडून सरळ घळणीवरुन खाली उतरुन रस्त्याच्या बाजूने वाहणाऱ्या व्हाळाशेजारील दलदलीच्या भागात जावून उभी राहीली. त्यावेळी श्रीकृष्ण राऊत यांनी अपघात वाचविण्याकरीता त्यांच्या ताब्यातील एस. टी. बस रस्त्याचे डावे बाजूस घेतली असता ती रस्त्याच्या कडेस असलेल्या गटारात जावून थांबली. सदर अपघातात एस. टी. बस क्रमांक MH-14- BT-3871 मधील प्रवासी १) रिया मालु गवस, २) वैभव लक्ष्मण नाईक, यांना किरकोळ दुखापती झाल्या होत्या त्याचप्रमाणे त्यांच्या समोरुन येणाऱ्या व घसरुन घळणीवरुन दलदलीत जावून थांबलेल्या एस. टी. बस क्रमांक MH-14-BT – 3974 मधील प्रवासी १) उलगप्पा गंगाप्पा पंडीवडार २) भागीरथी उलगप्पा पंडीवडार ३) बागुबाई कोया पटकारे ४) शशिकला शांताराम बेर्डे ५) परशु कृष्णा पाटील अशा ५ प्रवाशांना किरकोळ व गंभीर दुखापती झालेल्या होत्या. सदर सावंतवाडी बेळगाव एस. टी. बसचा क्रमांक एम.एच-१४-बी-टी-३९७४ वरील चालक म्हणून सर्वेश प्रमोद घाडी रा. कोलगाव ता. सावंतवाडी हे कार्यरत होते. सदर अपघाताबाबत चालक श्रीकृष्ण राऊत यांनी दोडामार्ग पोलिस स्थानक येथे फिर्याद दिलेली होती. सदर फिर्यादीस अनुसरुन तपास काम करुन दोडामार्ग पोलिस स्थानक यांनी संशयित आरोपी सर्वेश प्रमोद घाडी यांचे विरुद्ध दोडामार्ग येथील न्यायलयात भारतीय दंड संहिता कलम- २७९,३३७,३३८,४२७, मो.वा.का.कलम-१८४ प्रमाणे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले.
सदर साक्षीदार यांचा संशयित आरोपी तर्फे ॲङ परशुराम बाबुराव चव्हाण यांनी उलटतपास घेवून युक्तिवाद करण्यात आलेला होता. सदर आरोपी तर्फे घेतलेला उलटतपास तसेच करण्यात आलेला युक्तिवाद ग्राहय मानुन संशयित आरोपी याची मे. दोडामार्ग येथील न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी तसेच साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती च्या अनुषंगाने निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे विधिज्ञ अॅङ परशुराम बाबुराव चव्हाण यांनी काम पाहिले.