You are currently viewing गुलमोहोराची छाया…

गुलमोहोराची छाया…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुलमोहोराची छाया….*

 

गोड गुलाबी माझी काया गुलमोहराची छाया

खरंच करता खरंच करता नां प्रेम माझ्यावर राया….

 

रंग केशरी गुलाबी लाल

गुलमोहोराची सुंदर शाल

कसा फुलारला पानोपानी

तशी देखणी मी तुमची राणी

ऊन पांघरून करतो माया जगास देतो छाया..

खरंच करता खरंच करता ना प्रेम माझ्यावर राया..

 

पळस पांगारा उन्हाची शान

सारे दिसते लालेलाल रान

राने झडती फुलते काया

वसु लागते पहा फुलाया

वर उन्हाचे फुटती फटाके पहा हो फुटती लाह्या…

खरंच करता खरंच करता ना प्रेम माझ्यावर राया…

 

माझ्यावरती मायेची शाल

राया तुम्हीच ना माझी ढाल

छत्र गुलाबी फुलांचे धरा

माया गुलमोहोरावानी करा

झळ न लागो मला कुणाची राया मी तुमची काया…

खरंच करता खरंच करता ना प्रेम माझ्यावर राया….

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा