बेजबाबदार सत्ताधारी आणि माणुसकी हरवलेले सावंतवाडीकर
संपादकीय…..
सावंतवाडी शहराचा इतिहास पाहता शहरात सुख, चैन, ऐश्वर्य, आनंद ओसंडून वाहत आहे. निसर्गसौंदर्य तर अवर्णनीय आहेच परंतु सावंतवाडीचे लोक सुद्धा शांत, सुशिक्षित, सुसंस्कृत आहेत. आजपर्यंत सावंतवाडीत माणुसकीमध्ये कधीही भिंत उभी राहिली नाही, कोणावरही अन्याय झाल्यास सावंतवाडीकर जनता पेटून उठले हा इतिहास. सावंतवाडीचे आजपर्यंत झालेले नगराध्यक्ष मग ते चंद्रकांत वाडकर, दिलीप नार्वेकर, दीपक केसरकर, लोबो मॅडम असो वा बबन साळगावकर…..सर्वानीच जनतेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच सावंतवाडीत सौख्य नांदत होतं, नगराध्यक्ष, नगरसेवक यांना मान होता, शहरात इज्जत होती. कारण आज नगराध्यक्ष असलेली व्यक्ती उद्या नगरसेवक सुद्धा असेल की नाही हे जनताच ठरवते. त्यामुळे नगराध्यक्षांच्या खुर्चीला मान असतो, व्यक्तीला नाही. परंतु आजपर्यंत त्या खुर्चीवर बसलेल्या प्रत्येकाने खुर्चीचा आणि स्वतःचा मान देखील राखून ठेवला होता. त्यांच्यात माणुसकी शिल्लक असल्याचे दिसून येत होते.
आज रवी जाधव नामक उच्चशिक्षित तरुण आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी, नगरपालिका प्रशासनाने त्याचा तात्पुरता स्वरूपात उभारलेला व्यावसायिक स्टॉल काढून टाकत त्याचे विक्रीचे सामान मोडतोड करून कचऱ्याच्या गाडीतून भरून नेत नुकसान करत त्याला आणि त्याच्या पाच जणांच्या कुटुंबाला अन्नासाठी महाग केल्याच्या निषेधार्थ गेले पाच दिवस सावंतवाडी नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. रवी जाधव याने उत्सव कालावधीसाठी परवानगी घेऊन स्टॉल उभा केलेला, त्यामुळे तो कायमस्वरूपी जागा मागत असेल तर ती त्याची मागणी सुद्धा रास्त नसेल. परंतु *सावंतवाडीत नगरपालिका हद्दीत मटक्याचे अनधिकृत स्टॉल नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने उभे राहत असतील, परप्रांतीयांना कुठलीही अनामत रक्कम भरून न घेता क्षुल्लक मासिक भाड्यावर भरबाजारपेठेत स्टॉल उभारण्यास दिला जात असेल, परप्रांतीय फळ विक्रेत्यांना बाजारपेठेत नगरपालिका व्यापारी इमारतीत भाड्याने घेतलेल्या सहा बाय आठ च्या दुकान गाळ्याच्या बाहेर फुटपाथवर 10 ते 12 फुटांचे फळांचे दुकान मांडायला परवानगी मिळत असेल, तर एका स्थानिक दलित तरुणाला सावंतवाडी नगरपालिका कुठेच तात्पुरती जागा देऊ शकत नाही का?
सावंतवाडीत यापूर्वीच्या नगराध्यक्षानी दलितांवर कधीच अन्याय होऊ दिला नव्हता. दलित वस्ती सुधार सारख्या स्कीम राबवून दलितांना चाळी, घरे बांधून दिली, दलित वस्तीत चौविस तास पाणीपुरवठा सुरू राहण्यासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी, संडास, लायब्ररी, खेळण्यासाठी उद्यान, व्यायामशाळा आदी सुविधा पुरवल्या आहेत. सावंतवाडीत असलेला जिमखाना जवळील डोंबारी समाज झोपडी वजा घरात राहत होते, लाखे वस्तीतील घरांमध्ये त्यांना पुरेशा सुविधा नव्हत्या. परंतु दीपक केसरकर यांनी पुढाकार घेत डोंबारी समाजाला हक्काची आरसीसी घरे बांधून दिली, त्यांना स्वच्छतागृह, संडास बांधून देत सोयीसुविधा निर्माण केल्या. त्यामुळे दलित उपेक्षित असलेला समाज मानसन्मानाने शहरात राहू लागला. बदल्याचे, कपट नीतीचे राजकारण सावंतवाडीत आजपर्यंत झाले नव्हते. एखादा राजकारणी नाराज व्हायचा, परंतु दलित असो वा इतर कोणा विरुद्ध बदला घेत नव्हता किव्हा स्वतःची मनमानी करून आपल्यासमोर झुकायला लावत नव्हता.
सावंतवाडीत आज एक दलित न्यायाच्या प्रतीक्षेत उपोषण करत आहे तर सावंतवाडीतील सत्ताधारी असो वा सावंतवाडीकर जनता त्याच्याकडे दुर्लक्ष करते आहे. सावंतवाडीत गोरगरिबांना कपडे देण्यासाठी माणुसकीची भिंत उभी केलेली आपण पाहिली आहे, कित्येकांनी कपडे दान करत माणुसकी खुंटीला टांगल्याचे देखील सावंतवाडीने पाहिले आहे, परंतु *एक दलित, उच्चशिक्षित तरुण न्यायासाठी आपली बायको, चार वर्षांची मुलगी, वयोवृद्ध आईला घेऊन उन्हात, थंडीत फुटपाथवर रात्रंदिवस उपोषण करत असताना सावंतवाडीच्या सत्ताधाऱ्यांची आणि जनतेची माणुसकी मेली की काय?* असा प्रश्न कित्येकांच्या मनात उभा राहिला आहे.
उपोषण करणाऱ्या दलिताच्या उपोषणाचा सुद्धा काही राजकारणी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, दुसऱ्याच्या उपोषणावर आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा सुद्धा प्रयत्न होतो आहे, परंतु उपोषण करणाऱ्या तरुणाच्या जीवाची मात्र कोणीही पर्वा करताना दिसत नाही, त्याला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत सत्ताधारी नगरपालिकेत प्रवेश करताना उपोषणकर्त्या तरुणाकडे पाहून कुत्सित हसताना देखील काहींनी पाहिले असल्याची कुजबुज उपोषणस्थळी ऐकू येत आहे. त्यामुळे जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबियांच्या पोटापाण्याच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर आलेल्या तरुणांकडे दुर्लक्ष होत असल्याने, त्याची *कुणीही गंभीर दखल घेत नसल्याने त्याच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास त्यास जबाबदार कोण? सावंतवाडी शहरातील बेजबाबदार सत्ताधारी की माणुसकी हरवलेले सावंतवाडीकर?*
सावंतवाडीत आजपर्यंत दलितांवर असा अन्याय झाला नव्हता, कोणीही सत्ताधार्यांनी दलितांना उपोषण करत असताना वाऱ्यावर सोडले नव्हते, योग्यवेळी दखल घेत प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न सावंतवाडीच्या पुण्यभूमीत झालेला होता. परंतु ही पहिलीच वेळ आहे जिथे राजकारण करत एका दलिताला, स्थानिकाला न्यायासाठी रस्त्यावर येऊन उपोषण करायला लागत असून परप्रांतीयांचे चोचले पुरवत आपली तुंबडी भरून घेण्यात सत्रधारी धन्यता मानत आहेत.
त्यामुळे सावंतवाडीत सुरू असलेल्या दलित तरुणाच्या उपोषणामुळे आणि त्याच्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे तो राजकीय बळी तर ठरणार नाही ना? अशी चर्चा आज जोर धरू लागली आहे.