*ऑनलाइन फसवणुकीपासून सावधान – पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर*
*महिला ग्रामसंघ मार्फत मुलांना सायबर क्राईमचे मार्गदर्शन*
*बांदा*
इंटरनेटवरून होणारे आर्थिक व्यवहार, मोबाईल ॲपचा वाढता वापर यामुळे सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. बँकेतून बोलत असल्याचे भासवून ओटीपीची मागणी करणे अशा प्रकारचे फोन आपणास येऊ शकतात. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार तसेच मोबाईल वापरताना सावधगिरी बाळगा, असे आवाहन पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर यांनी केले.
महिला ग्राम संघ पाडलोस व कुटुंबश्री एनआरओ केरळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाडलोस शाळा नं.1 येथे बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना सरपंच पेडणेकर बोलत होत्या. उपसरपंच राजू शेटकर, माळेवाड प्रभागचे सीएलएफ प्रचिती मडुरकर, ग्रामसेवक प्रतिभा आळवे, ग्रा.पं. सदस्य रोशनी गावडे, श्री स्वामी समर्थ ग्राम संघ पाडलोस अध्यक्ष मयुरी हरिजन, कोषाध्यक्ष मयुरी कुबल, लिपिका शितल गावडे, सीआरपी नेहा नाईक, शिक्षक अनिल वरक, पोलीस पाटील रश्मी माधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजल गावडे, आशाताई विजया पालकर, ग्रा.पं. सदस्य गौरी शेटकर, प्रतीक्षा गावडे, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. बांदा पोलिसांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर क्राईम संदर्भात मार्गदर्शन केले.
माळेवाड प्रभाग संघाच्या प्रचिती मडुरकर म्हणाल्या की, पाडलोस गावातील मुलांसाठी ओम गणेश बालसभेची स्थापना करण्यात आली. त्यामुळे बालसभेतून मुलांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. मुलांच्या सर्व समस्या वरिष्ठ पातळीवर नेण्यात येतील असे आश्वासन मडुरकर यांनी दिले.
उपसरपंच राजू शेटकर, ग्रामसेवक प्रतिभा आळवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अनिल वरक यांनी केले. प्रास्ताविक प्रचिती मडुरकर यांनी तर आभार शितल गावडे यांनी मानले.
पाडलोस महिला ग्राम संघाच्या पुढाकाराने ओम गणेश बालसभेची स्थापना करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष सानिका गावडे, सचिव गौतमी केणी, उपाध्यक्ष गोपाळ नाईक, सहसचिव दीक्षा पाडलोसकर यांची एकमताने निवड करण्यात आली. ही बालसभा म्हणजे मुलांना व्यासपीठ मिळाले असल्याचे मान्यवरांनी सांगितले.