*सुरेश भट यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मागणी*
================
अमरावती (प्रति) : “उष:काल होता होता काळ रात्र झाली, केव्हा तरी पहाटे, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या” सारख्या शेकडो गीतांनी मराठी साहित्य अजरामर व समृद्ध करणाऱ्या कवीश्रेष्ठ सुरेश भट यांचा आज स्मृतिदिन. संपूर्ण महाराष्ट्राला कवितेच्या संदर्भात, गझलेच्या संदर्भात, अमूल्य अशी ठेव दिलेली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर त्यांचा नावलौकिक आहे. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपूरला रेशीमबाग परिसरामध्ये अतिशय भव्य दिव्य असे कवी श्रेष्ठ सुरेश भट सभागृह उभारण्यात आले आहे. मात्र त्यांच्या जन्मगावी तसेच भट साहेबांचा बहुतांश काळ ज्या अमरावतीमध्ये गेला त्या अमरावतीमध्ये मात्र सुरेश भटांच्या नावाने कुठलेही भवन, सभागृह, सांस्कृतिक केंद्र एवढेच काय त्यांचे नाव कुठल्या ही रस्त्याला देण्यात आलेले नाही. सुरेश भटांच्या कार्याचा गौरव म्हणून अमरावती महानगरपालिकेने, अमरावती जिल्हा परिषदेने, जिल्हा परिषद प्रशासनाने तसेच अमरावतीचे पालकमंत्री खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी यांनी कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट यांचे स्मारक किंवा त्यांच्या नावाने सभागृह अमरावतीला होण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन सुरेश भटांचे जिवलग मित्र व साहित्य संगम या साहित्यिक संस्थेचे सचिव तसेच सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी आज एका दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले आहे. ते पुढे म्हणाले की सुरेश भटांचा बराचसा काळ हा अमरावतीला गेलेला आहे. त्यांचे जिवलग मित्र सर्वश्री अरविंद ढवळे डॉ. मोतीलाल राठी,वली सिद्धीकी, रामदास भाई सराफ, दादा इंगळे या त्या लोकांनी सुरेश भटांच्या पडत्या काळात सुरेश भटांना खऱ्या अर्थाने आधार देऊन कवितेच्या क्षेत्रामध्ये समर्थपणे उभे केले आहे. योगायोगाने सुरेश भटा बरोबर दीर्घकाळ राहण्याचा मला अनुभव आहे त्यांचे हे कार्य लक्षात घेता शासनाने या कामी त्वरेने पुढाकार घ्यावा असेही याप्रसंगी त्यांनी आपल्या मुलाखती मध्ये नमूद केले आहे.
याप्रसंगी सुप्रसिद्ध मराठी कवी श्री विष्णू सोळंके, राज्यसभा सदस्य खासदार व अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री रवींद्र दांडगे तसेच सुरेश भट यांचे मित्र व समर्थ ऑप्टिकल्स या प्रतिष्ठानचे संचालक श्री संदीप गोडबोले,एन डी टी वी मराठीचे पत्रकार शुभम बायस्कर आदी उपस्थित होते. सुरेश भटांची जयंती आणि पुण्यतिथी ही अमरावतीला मोठ्या व भव्य प्रमाणात साजरी करण्यात यावी असा एकमुखी निर्णय आजच्या या प्रसंगी घेण्यात आला. दरम्यान कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट यांचे बडनेरा रोडवरील भटवाडी येथील निवासस्थानी भेट देण्यात आली. भट परिवारातर्फे श्री ओंकार जोशी यांनी अभ्यागतांचे स्वागत केले. सुरेश भटांचे भव्य स्मारक अमरावतीला व्हावे यासाठी आतापर्यंत पालकमंत्र्यांना तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदन देण्यात आलेले आहे. आता सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन या कामी पुढाकार घ्यावा असे मत याप्रसंगी सर्वांनी व्यक्त केले आहे.